नागपूर : उमरेड तालुक्यातील सुरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि भाजपा उमरेडचे तालुका महामंत्री राजू ढेंगरे यांची शुक्रवारी मध्यरात्री निर्दयीपणे हत्या करण्यात आली. राजू भाऊराव ढेंगरे (४८, रा. दिघोरी, नागपूर) असे मृताचे नाव असून त्यांचा नागपूर-उमरेड महामार्गावर असलेल्या कुही फाट्यालगत ढाबा आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २:३० वाजताच्या सुमारास राजू ढेंगरे गाढ झोपेत असतानाच ढाब्यावर काम करणाऱ्या दोन नोकरांनी त्यांचा गळा आवळून डोक्यावर काठीने हल्ला केला.
तीन वर्षांपासून राजू ढेंगरे हे कुही फाट्यालगत ढाबा चालवितात. सोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात या परिसरात त्यांचे नाव आहे. नुकत्याच पार पडलेल्या सुरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ते सदस्य म्हणून विजयी ठरले होते. महिनाभरापूर्वी त्यांनी ढाब्यावर मंडला आणि आदी नामक दोन नोकर ठेवले होते. दोन्ही नोकरांना दिवाळीच्या कारणावरून गावाकडे परतीला जायचे होते. त्यांनी राजू ढेंगरे यांना मजुरी मागितली. यावरून भांडण झाले. थोडा वादही उद्भवला.
राजू ढेंगरे यांचे दिघोरी येथे निवासस्थान आहे. कधी ढाबा तर कधी घरी असा त्यांचा मुक्काम असतो. शुक्रवारी उशीर झाल्याने ते ढाब्यावर असलेल्या खाटेवरच झोपी गेले. गाढ झोपेत असताना आरोपींनी कापडाने गळा आवळला. काठीने वार केले. यामध्ये राजू ढेंगरे गंभीर जखमी होत, जागीच ठार झाले. त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर, डोक्यावर गंभीर मार आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाले. या संपूर्ण घटनेवेळी अन्य एक पांडू नावाचा नोकर घटनास्थळी होता. कुही पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध ३०२ (३४) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस यंत्रणा करीत आहे.
राजू ढेंगरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा व्यक्त होत आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे.
आरोपी कोण, कुठले?
मृत राजू ढेंगरे यांनी नोकरांना कामावर ठेवताना त्यांच्याकडून कोणतेही कागदपत्रे घेतली नाही. आरोपींचे नाव आणि गाव कुणालाही माहिती नाही. त्यांच्या बोलीभाषेवरून ते मध्य प्रदेशातील असावेत असा कयास लावला जात आहे.
एक धागा मोबाइलचा..
राजू ढेंगरे यांनी दोन्ही नोकरांना कामावर ठेवताना आधार कार्डही घेतले नसावे, यामुळे त्यांचा पत्ता लागू शकला नाही. आता केवळ मोबाइलचा सीडीआर तपासल्यानंतरच एक धागा मोबाइलचा या खुनाच्या तपासात तपास यंत्रणेला कामाचा ठरणार आहे.
चारचाकीने पोबारा
हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी राजू ढेंगरे यांचे चारचाकी वाहन पळविले. ढाब्यावरच त्यांची एमएच ४० एसी ७७०७ ही अल्टो गाडी उभी होती. आरोपींनी वाहनाची चाबी घेत, चारचाकीने पोबारा केला.
अपघातानंतर पुन्हा अपघात
घटनास्थळावरून आरोपींनी चारचाकी वाहन पळविल्यानंतर काही अंतरावर जात नाही तोच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. विहीरगाव पुलालगत असताना अल्टो कार पलटली. अपघातानंतर काहींनी धाव घेत दोघांनाही सहीसलामत बाहेर काढले. अशातच काही अंतरावर पुन्हा एका वाहनाचा अपघात झाला. लोकांनी दुसऱ्या अपघात स्थळाकडे धाव घेतली. तर इकडे या दोन्ही आरोपींनी अपघात स्थळावरून पळ काढला.