लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना घेऊन नागपूरला येण्यास निघालेल्या पटेल यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांच्या कारला एका अज्ञात ट्रेलरचालकाने धडक दिल्याने एका उपनिरीक्षकासह चौघे जखमी झाले. सोमवारच्या पहाटे २ ते २.१५ च्या सुमारास नागपूर-भंडारा मार्गावरील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालगाव येथे हा अपघात घडला.माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना वाय श्रेणीची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत विशेष सुरक्षा पथकाचे (एसपीयू) नेहमी एक पथक असते. नेहमीप्रमाणेच विशेष सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गिरी, शिपाई मनोज कांबळे, जग्गू मुंगळे आणि कारचालक प्रवीण दुर्गे आदी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पटेल यांच्या वाहनासोबत गोंदिया येथून नागपूरला येण्यास निघाले. पटेल यांची कार पुढे तर त्यांना सुरक्षा देणारे विशेष सुरक्षा पथकाचे वाहन येत होते. महालगाव येथून कारसमोर लोखंड भरलेला एक ट्रेलर उजव्या बाजूने जात होता. त्यामुळे कारचालक प्रवीण दुर्गे यांनी डाव्या बाजूने कार काढली. अचानक ट्रेलरचालकाने आपला टेलर डाव्या बाजूने वळविला त्यामुळे दुर्गे यांनी करकचून ब्रेक मारून कार थांबविली. मात्र, ट्रेलरचा मागील पल्ला घासत गेल्यामुळे कारमधील चौघेही सुरक्षा रक्षक जखमी झाले. उपनिरीक्षक गिरी यांच्या डोक्याला जबर मार बसला तर, कांबळे आणि मुंगळे यांच्या पायाला दुखापत झाली.जखमी शिपायांनी या घटनेची माहिती विशेष सुरक्षा पथकाला दिली. त्यामुळे सुरक्षा पथकाच्या पोलीस निरीक्षक सुनीता मेश्राम आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. तिकडून मौदा ठाण्याचे सहायक निरीक्षक काळे घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रुग्णवाहिकेतून जखमींना पारडी येथील भवानी हॉस्पिटल येथे आणण्यात आले. प्रथमोपचारानंतर नागपुरातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात ट्रेलर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मौदा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:58 AM
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना घेऊन नागपूरला येण्यास निघालेल्या पटेल यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांच्या कारला एका अज्ञात ट्रेलरचालकाने धडक दिल्याने एका उपनिरीक्षकासह चौघे जखमी झाले.
ठळक मुद्देउपनिरीक्षकासह चौघे किरकोळ जखमी : मोठा अनर्थ टळला