नागपूर : शतकीय वर्ष साजरे करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठ गेल्या काही दिवसात विविध वादग्रस्त घटनांनी चर्चेत आले आहे. विद्यापीठातील अशा अनियमिततेविरोधात ‘विद्यावेध’ या संघटनेच्या माध्यमातून माजी कुलगुरुंनी दंड थोपटले आहे. त्यांच्यासोबत विविध विभागाच्या माजी विभागप्रमुखांचाही सहभाग आहे.
विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, माजी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत कोमावार, माजी जनसंपर्क अधिकारी डॉ. श्याम धोंड हे या संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची पोलखाोल करणार आहेत. प्रशासनिक स्तरापासून न्यायालयापर्यंतची लढाई लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
डॉ. काणे यांच्या मते नवे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पदभार सांभाळल्यानंतर विद्यापीठात वाद वाढले आहेत. डॉ. काणे यांच्या कार्यकाळातच एमकेसीएल कंपनीकडून परीक्षेचे कामकाज काढून विद्यापीठातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र डॉ. चाौधरी यांनी कोणत्या कारणाने कंपनीला परत आणले, हे समजण्यापलिकडे असल्याचा आक्षेप डॉ. काणे यांनी घेतला. परीक्षा विभाग पूर्णपणे कोलमडले आहे. दुसरीकडे विद्यापीठाच्या पीजी विभागामध्ये नियमित प्राध्यापक नसताना या विभागांना स्वायत्त घोषित करण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेचा बट्ट्याबोळ होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
डॉ. विनायक देशपांडे यांनीही विद्यापीठाच्या नवीन शिक्षण धोरण लागू करण्याच्या घाईवर आक्षेप घेतला. नव्या धोरणात अद्याप स्पष्टता नाही. विद्यार्थी एकापेक्षा अधिक शाखेत अभ्यासक्रम निवडू शकतो पण महाविद्यालयात तो अभ्यासक्रमच नसेल तर विद्यार्थी दोन महाविद्यालयात प्रवेश कसा करणार, हा प्रश्न त्यांनी केला. या प्रश्नांच्या समाधानासाठी विद्यावेध राज्यभरात जागृती अभियान राबवेल, अशी माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली.
--