नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे बुधवारी रात्री पावणेदहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. हरिभाऊ केदार यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील ता. चिखली येथील गुंजाळा येथे शेतकरी कुटुंबात २९ मे १९३५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बुलडाणा जिल्ह्यात, तर पदवीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे झाले आणि नागपूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असतानाच ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. त्यानंतर नागपूर नागरी शिक्षण मंडळाच्या शाळेत काही वर्षे शिक्षकी नोकरी गेली आणि पुढे ते ईश्वरबाबू शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक झाले.
१९६० ते १९९५ पर्यंत ते याच महाविद्यालयात प्राचार्य म्हणून दीर्घकाळ सेवेत राहिले. क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयात त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. शारीरिक शिक्षणाच्या उच्च शिक्षणासाठी काही वर्षे ते डेन्मार्क व नार्वे येथे राहिले. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कारही प्राप्त झाला. भारतीय स्काऊटचे मानद आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
१९८९ ते ९० या काळात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून दोन वेळा पदभार सांभाळला. काही काळ ते नागपूर विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्ष होते. ते नागपूर काँग्रेसचे काही काळ अध्यक्षही होते. ते नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणातही सक्रिय राहिले आणि काही वर्षे ते स्थायी समितीचे अध्यक्षही होते. डॉ. हरिभाऊ केदार यांचा गांधी-आंबेडकर विचारांवर प्रचंड विश्वास होता. नागपुरातील सर्वच पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळींना त्यांचा भक्कम आधार होता. त्यांची विवेकनिष्ठा आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम होती. ते आपल्या सामाजिक व वैचारिक बांधीलकीपासून कधीही परावृत्त झाले नाहीत.
मूलतत्त्ववाद आणि कट्टर धार्मिकतेला त्यांनी प्राणपणापासून विरोध केला. नागपुरातील दक्षिणायन चळवळीचे ते प्रमुख आधारस्तंभ होते. २०१७ मध्ये मध्य प्रदेशात महात्मा गांधी यांचा पुतळा हटविल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ते पुढे आले. संविधान चौकात झालेल्या अनेक सभांमध्ये त्यांनी हजेरी लावली. याच वर्षी ७ फेब्रुवारीला त्यांच्या ‘स्नेहबंध’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले होते.
..............