नरेश डोंगरे - कमल शर्मा
नागपूर : लॉयडस् अर्थात उत्तम गलवा कंपनीच्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या गावातील जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या प्रदूषणाचा त्रास वाढत असला आणि नागरिकांच्याही तक्रारी असल्या तरी प्रशासन मात्र आंधळे बनल्यासारखे वागत आहे. भविष्यात या प्रदूषणाचे गंभीर परिणाम दिसले तर त्याला जबाबदार उत्तम गलवाच असणार आहे.
या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कंपनीशी साटेलोटे असल्याने अनेक अधिकारी खुलून बोलत नाहीत. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली आहे.
कंपनीने आपले पाप झाकण्यासाठी आणि कोट्यवधींची मलाई लाटण्यासाठी अनेकांची तोंडं बंद केलीत. त्यामुळे प्रदूषणाच्या रुपातून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ संबंधित यंत्रणांना दिसत असूनही बहुतांश मंडळी तोंडावर बोट ठेवून बसली आहे. त्यामुळेच काळे थर असलेल्या विहिरी बघायला अधिकारी तयार नाहीत.
विहिरी, हातपंपांमधून दूषित पाणी येऊनही त्याबाबत कुणी कंपनीला जाब विचारायला तयार नाहीत. नाईलाजाने हेच आरोग्यास घातक पाणी गावकऱ्यांना प्यावे लागत आहे. स्वयंपाकासाठी आणि आंघोळीसाठी हे पाणी वापरावे लागत असल्याचे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
तेच पाणी, त्याच भाज्या ?
या दूषित पाण्यावर शेतमाल आणि भाजीपाला पिकवला जातो. लोहयुक्त पाण्याचे सत्व यात उमटत असले तरी जनतेला पर्याय नाही.
बेबंदशाही टोकाला
शेतजमीन धोक्यात आणून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या, विषारी धूर ओकून प्रदूषण निर्माण करतानाच जनतेचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या आणि बेरोजगारांवर सूड उगविणाऱ्या लॉयडस् -उत्तम गलवा कंपनीची बेबंदशाही टोकाला पोहचली आहे. कोट्यवधी रुपयांचा नफा ओरबाडून घेणाऱ्या या कंपनीच्या पापाची लक्तरे ‘लोकमत’ने वेशीवर टांगल्याने जनतेच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. वारंवार मागण्या, निवेदने यांना केराच्या टोपल्या दाखविल्या जात आहे. चापलुसी करणाऱ्या लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्यांना ताटाखालचे मांजर बनवून कामगारांच्या तसेच त्यांच्यासाठी लढू पाहणाऱ्या नेत्यांचा आवाजही या कंपनीने चिरडला आहे.
जनआंदोलन भडकणार
लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केल्यामुळे आपला आवाज बुलंद केल्याची भावना जनतेची झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या विरोधात जोरदार जनआंदोलन चालविण्याचा निर्णय विविध संघटना आणि युवक नेत्यांनी घेतला आहे.
... तरीही शेती फुलविण्याचे प्रयत्न
जमीन आणि पिकाची अवस्था वाईट असताना शेतजमीन पडीक ठेवणे परवडणारे नाही. जमीन वाहिली नाही तर ती पडीक होण्याचा धोका असल्याने दोन्हीकडची कोंडी पचवत शक्य तेवढे काबाडकष्ट करून शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत.