नागपूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे गाजावाजा सुरू असलेल्या पायाभूत चाचणीचे पेपरच उपलब्ध न झाल्याने गुरुवारी पहिल्या दिवशी काही शाळांमध्ये पायाभूत चाचणीचा पेपर रद्द करण्याची नामुष्की जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यांच्यावर ओढवली. याला जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही तितकाच जबाबदार आहे.
एमएससीईआरटीतर्फे मागील वर्गाच्या क्षमतांवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी १७ ते १९ ऑगस्ट या कालावधीत राज्यभर घेतली जात आहे. परंतु, नियोजन शून्यतेमुळे काही वर्गांच्या प्रश्नोत्तर पत्रिका नागपूर जिल्ह्यातील शाळांना उपलब्ध झालेल्या नाहीत. परिणामी काही विषयांचे पेपर रद्द करण्यात आले. अशीच परिस्थिती अन्य जिल्ह्यांतही आहे.
डायटची नियोजन शून्यता व नागपूर जि. प.च्या शिक्षण विभागाच्या (प्राथ.) बेपर्वा कारभारामुळे इयत्ता तिसरी ते पाचवीच्या प्रश्नोत्तर पत्रिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. तर इयत्ता सहावी ते आठवीच्या प्रश्नोत्तर पत्रिका काही शाळांमध्ये कमी पडल्या. वास्तविक ८ ऑगस्टपूर्वीच या परीक्षेचे पेपर जिल्हास्तरावर पाठविण्यात आल्याचे एमएससीईआरटीने कळविले होते. परंतु, पेपर पुरेशा प्रमाणात आहेत की नाहीत, याची योग्यप्रकारे खातरजमा करण्यात आलेली नाही.
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी मात्र यासाठी डायटला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष लिलाधर ठाकरे यांनी यासाठी डायट व शिक्षण विभाग दोषी असल्याचे सांगितले.