लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या सत्तास्थानी येणाऱ्या भाजपाच्या नेतृत्वातील ‘रालोआ’चा (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) पाया नागपुरात रचला गेला होता. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणी ताजा करत असताना ज्येष्ठ पत्रकार व नौदलात काम केलेले जयंत (मामा) हरकरे यांनी हा खुलासा केला.‘लोकमत’शी विशेष चर्चा करत असताना हरकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस हे कर्मठ व देशभक्त नेता असल्याचे सांगितले. जॉर्ज यांनी श्रमिकांना संघटित केले व एक मजबूत मंच दिला. ‘रालोआ’ची निर्मिती १९९८ मध्ये झाली. मात्र याचे बीज १९९० नंतरच रोवले गेले होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी नागपुरात येऊन तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याशी चर्चा केली होती. शहरातील काही समाजवादी नेत्यांनी हरकरे यांच्याकडे या दोघांची भेट करवून देण्याची जबाबदारी सोपविली होती. यासंदर्भात जॉर्ज यांच्याशी संपर्क साधला असता, रात्री बैठक करण्याचे जॉर्ज यांनी सांगितले. रात्री ९ नंतर जॉर्ज संघ मुख्यालयात पोहोचले होते. देवरस यांनी त्यांचे स्वागत केले होते. देशाच्या वर्तमान स्थितीवरून चर्चेला प्रारंभ झाला. त्यानंतर देवरस यांनी जॉर्ज यांना १९७७ प्रमाणे विरोधी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस विरोधात मोर्चा उघडण्याचा सल्ला दिला. आणीबाणीच्या काळात आपण संघाच्या विचारधारेचा अभ्यास केला व संघ स्वयंसेवकांच्या नि:स्वार्थ कार्याने प्रभावित झालो, असे जॉर्ज यांनी देवरस यांना सांगितले होते.अशास्थितीत देवरस यांच्या सल्ल्याचा विचार करण्याचे आश्वासनदेखील जॉर्ज यांनी दिले होते. या बैठकीनंतर ‘रालोआ’साठी प्रयत्न सुरू झाले. या आघाडीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली, असे हरकरे यांनी सांगितले. जॉर्ज ‘रालोआ’चे २००८ पर्यंत संयोजक होते.
अन जॉर्ज यांनी संपादरम्यान मिळवून दिली टॅक्सीहरकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी पहिल्या भेटीबाबत यावेळी सांगितले. १९५९ साली मी नौदलात होतो. त्यावेळी विशाखापट्टणम् येथे माझी बदली झाली होती. तेथे जाण्यासाठी मुंबईला पोहोचलो तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात संप झाला असल्याची माहिती कळली. एकही टॅक्सी चालत नव्हती. एक टॅक्सी मिळाली, मात्र त्याने जाण्यास नकार दिला. मला जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी भेटायचे आहे, असे त्याला सांगितले तेव्हा तो तयार झाला. त्यावेळी मी नौदलाच्या गणवेशात होतो. मला बंदरावर पोहोचणे अत्यावश्यक आहे. जर मी वेळेत पोहोचलो नाही तर कोर्टमार्शल होईल, असे मी जॉर्ज यांना सांगितले. जॉर्ज यांनी माझी समस्या ऐकताच टॅक्सीवाल्याला तेथे पोहोचून देण्यास सांगितले, असे हरकरे यांनी सांगितले.