नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे पाईक व नागपूर-अमरावती मार्गावरील दाभा येथील आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे १२ सप्टेंबर २०२३ रोजी हृदयविकाराने वयाच्या ९३ व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्यावर आंतरभारती आश्रम दाभा सायंकाळी ४ वा आश्रमातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील पाचगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबात २० नोव्हें. १९३० रोजी जन्मलेले डॉ.भाऊ झिटे यांनी वर्ध्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. तरुण वयातच झालेल्या क्षयरोगाच्या उपचारासाठी ते नागपूरच्या डॉ. गुमास्ताकंडे दाखल झाले. उपचारानंतर भाऊ गुमास्ताकंडे डिस्पेंसर म्हणून काम करू लागले. सन १९५९ मध्ये दाभा येथे एकेकाळी माळरान असलेल्या आजच्या आश्रमाच्या दहा एकर जागेवर आंतरभारती आश्रमाची स्थापना केली. आंतरभारती आश्रमात अनेक उपक्रम चालतात.
१९७५ मध्ये भाऊंनी आंतरभारती होमिओपॅथीचे महाविद्यालय सुरू केले होते. आश्रम केवळ वैद्यकीय सेवेसाठीच नव्हे तर, योगशिक्षण, निसर्गोपचार आणि आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रांत संपूर्ण विदर्भात सेवाभावी आश्रमाचा आदर्श म्हणून प्रसिद्धीस आला आहे. गोपालन आणि स्वावलंबन वस्त्रनिर्मिती हे प्रकल्पही ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविले जातात.
वर्धापन दिनी विश्वशांती संदेश यात्रा
१४ फेब्रुवारी हा आंतरभारती आश्रमाचा वर्धापनदिन असतो. दरवर्षी आश्रमात १४ फेब्रुवारीला विश्वशांती संमेलन साजरे केले जाते. दीड ते दोन हजार लोक एकत्र येतात. विश्वशांती संदेश यात्रा काढली जाते.