नागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी देवलापार येथील शिवसेना कार्यकर्ता धनेश बंसीधर गुप्ता (२५) यांच्या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात चार आरोपींना दोषी ठरवले तर, नऊ आरोपींना निर्दोष सोडले. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला. दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींच्या शिक्षेवर येत्या शनिवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतर या आरोपींना कायद्यानुसार शिक्षा सुनावली जाईल.
खुनासह इतर संबंधित गुन्ह्यांत दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींमध्ये तुफानसिंग इंदल यादव, सुनील गोपाल यादव, मलखानसिंग अश्रफीलाल यादव व प्रेमलाल अश्रफीलाल यादव यांचा समावेश आहे. वीरेंद्र लखन यादव, वासुदेव धासू गटे, ओमप्रकाश श्रीराम निंबोने, सुनील लालबहादूर यादव, लखन मोहनसिंग यादव, राजेश संपत घोडेस्वार, रवींद्र रामचंद्र भैसारे, इंदलसिंग अश्रफीलाल यादव व जयसिंग अश्रफीलाल यादव हे आरोपी निर्दोष सुटले आहेत. ही घटना १६ जुलै २०१४ रोजी घडली होती.
देवलापार येथे गुप्ता यांचे विविध व्यवसाय आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले यादव कुटुंब त्यांचे स्पर्धक होते. त्यातून त्यांचे वेळोवेळी खटके उडत होते. पवनी येथील आठवडी बाजाराचे कंत्राट आधी गुप्ता यांच्याकडे होते. ते विक्रेत्यांकडून भाडे वसूल करीत हाेते. त्यानंतर ते कंत्राट यादव कुटुंबाला देण्यात आले. त्यावरूनही आरोपींचा गुप्तासोबत वाद झाला होता. घटनेच्या दिवशी आरोपींनी धनेश गुप्ता व त्यांचे भाऊ स्मित यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, तुफानसिंगने त्याच्याकडील बंदूक काढून धनेश यांच्यावर गोळीबार केला. परिणामी, त्यांचा मृत्यू झाला. आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळे स्मितही गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन त्यांना अटक केली होती. न्यायालयात सरकारतर्फे विशेष ॲड. प्रशांत सत्यनाथन, आरोपींतर्फे वरिष्ठ ॲड. अविनाश गुप्ता व ॲड. आर. के. तिवारी तर, गुप्ता कुटुंबातर्फे ॲड. अशोक भांगडे यांनी कामकाज पाहिले.
नागरिकांनी केले होते आंदोलन
या घटनेनंतर देवलापार येथील नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी देवलापारसह पवनी व चोरबावली येथे आंदोलन केले होते. दरम्यान, चक्काजाम व जाळपोळही करण्यात आली होती. परिणामी, हे हत्याकांड राज्यभर चर्चेत आले होते.