चार वकिलांनी न्यायालयाचा अवमान केला : नोटीस जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:55 PM2019-04-30T22:55:19+5:302019-04-30T22:55:55+5:30
अकोला येथील अॅड. मधुसुदन बी. शर्मा (५०), दिनेश रामेश्वरलाल खुरानिया (४०), अजय नीळकंठ जोशी (४०) व श्रवण काशिद या चार वकिलांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदृष्ट्या दिसून येते असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नोंदवले. तसेच, या वकिलांविरुद्धचे अवमानना प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले व त्यांना नोटीस बजावून १ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अकोला येथील अॅड. मधुसुदन बी. शर्मा (५०), दिनेश रामेश्वरलाल खुरानिया (४०), अजय नीळकंठ जोशी (४०) व श्रवण काशिद या चार वकिलांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदृष्ट्या दिसून येते असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नोंदवले. तसेच, या वकिलांविरुद्धचे अवमानना प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले व त्यांना नोटीस बजावून १ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अकोला जिल्हा न्यायालयाने या वकिलांविरुद्ध उच्च न्यायालयाकडे अवमाननेचा रेफरन्स सादर केला होता. एका फौजदारी प्रकरणातील आरोपी २०१६ पासून फरार होता. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने त्याच्याविरुद्ध १८ जून २०१८ रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. त्यानंतर आरोपीतर्फे शर्मा यांनी न्यायालयात हजर होऊन आरोपीला जामीन मागितला. जामीन नाकारण्यात आल्यानंतर शर्मा यांनी न्यायालयाची बदनामी व नकारात्मक प्रसिद्धी करायला सुरुवात केली. त्यांनी ते स्वत: अॅडमिन असलेल्या व्हॉटस्अॅप ग्रुपवरही न्यायालयाचा अवमान करणाऱ्या पोस्ट टाकल्या. इतर तीन वकील त्या ग्रुपचे सदस्य होते. त्यांनीदेखील विविध आक्षेपार्ह पोस्टद्वारे न्यायालयाचा अवमान केला. शर्मा यांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यासाठी वकिलांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली. दरम्यान, अकोला वकील संघ जिंदाबाद अशा घोषणा दिल्या असे रेफरन्समध्ये नमूद करण्यात आले होते. या प्रकरणात अॅड. फिरदोस मिर्झा न्यायालय मित्र असून त्यांना अॅड. अब्दुल सुभान यांनी सहकार्य केले.