लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालमजुरी प्रकरणामध्ये चार आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली. टीटीईच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला.विश्वनाथ सोमरसाव (५१), हिरालाल धरम साव (३४), दशरथ विश्वनाथ सोमरसाव (२५) व संजितकुमार सोहन मिस्त्री (२५) अशी आरोपींची नावे असून पहिले तीन आरोपी हिरोडी, झारखंड तर, चौथा आरोपी बंदीचक, नवादा, बिहार येथील रहिवासी आहे. ते सात अल्पवयीन मुलांना मजुरी करण्यासाठी हटिया-पुणे एक्स्प्रेसने सोबत घेऊन जात होते. ही रेल्वेगाडी गोंदिया येथून सुटल्यानंतर टीटीई कर्णसिंह पाटले, कल्लू मिना व सुशीलकुमार यांना आरोपींवर संशय आला. त्यामुळे त्यांनी मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमला याची माहिती दिली. त्यानुसार निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनी रेल्वे चाईल्ड लाईन प्रतिनिधी गौरी शास्त्री-देशपांडे व अन्य जवानांसोबत दुपारी १२.३० वाजता आठव्या फलाटावर पोहोचून आरोपींना अल्पवयीन मुलांसह रेल्वेतून खाली उतरवले. सखोल विचारपूस केली असता आरोपींनी मुलांना मजुरी करण्यासाठी मुंबईला घेऊन जात होतो असे सांगितले. मुलांनीही त्याला दुजोरा दिला. आरोपींनी मुलांच्या पालकांना १५०० ते ३००० रुपये महिना वेतन देण्याचे आमिष दाखवले होते. पुढील चौकशीमध्ये मुलांना मुंबईला नाही तर, भुसावळ येथे नेण्यात येत होते, अशी माहिती पुढे आली. त्यानंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलांना बाल संरक्षणगृहात पाठविण्यात आले.आरपीएफ कमांडंट ज्योतीकुमार सतिजा व दपूम रेल्वेचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील अधिकाऱ्यांसह उपनिरीक्षक एस. पी. सिंह, एस. एस. बघेल, प्रधान आरक्षक दिनेश सिंह, सुशील मलिक, प्रकाश रायसेडाम, अरविंद टेंभुर्णीकर, आरक्षक विकास शर्मा, विवेक कनोजिया, विनोद राठोड, ईशांत दीक्षित व पी. एल. पटेल यांनी ही कारवाई केली.
बालमजुरांना कामावर नेणाऱ्या चौघांना अटक : आरपीएफची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:03 PM
बालमजुरी प्रकरणामध्ये चार आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली. टीटीईच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला.
ठळक मुद्देटीटीईच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस