नागपूर : पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी मिळाल्याने मिनिमातानगर येथील एका तरुणाने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांसह एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
मनीष रामपाल यादव (३५, मिनिमातानगर) असे मृताचे नाव आहे. मनीषला काजल नावाच्या १९ वर्षीय तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात फसविले. त्यानंतर तिचे वडील शिवनरेश श्रीवास्तव (४०), आई गुडिया श्रीवास्तव (३८) व रमेश रामबहादूर सोनार (४३, लकडगंज) यांनी त्याला पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. जर पैसे दिले नाहीत तर अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. पैशांची व्यवस्था न झाल्याने मनीष तणावात होता.
१० सप्टेंबर रोजी तो घरातून दुचाकीने निघाला व कन्हान नदीच्या काठावर पोहोचला. त्याने फेसबुक लाइव्ह करत आपबीती मांडली व त्यानंतर त्याने कन्हान नदीत उडी घेत जीव दिला. सोमवारी सकाळी कन्हान नदीत शव आढळले. पोलिसांनी व्हिडीओत ज्यांची नावे नमूद होती, त्यांना बोलावून चौकशी केली. दरम्यान, मनीषचे भाऊ मनोज यांनी आरोपींविरोधात कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली व त्यानंतर चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांना मंगळवारी अटकदेखील केली. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे.