योगेंद्र शंभरकर
नागपूर : मध्य प्रदेशातील सवरनी जंगलातून सागवानाची अवैध कटाई करून ते ट्रकमधून नागपुरात आणण्याचा प्रकार उघकीस आला आहे. नागपुरातील कापसी येथील एका आरा मशीनवर आणले जात असलेले सागवान लाकूड जप्त करण्यात आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.
ही टोळी ट्रकमध्ये सागवान भरून वरून वांगी अथवा भाजीपाल्याच्या टोपल्या ठेवून ही तस्करी करत होते. वन विभागाच्या पथकाने या चौघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. भूपेंद्र राजेश श्यामकुंवर (१८ वर्षे, दाभा), अंकित अनिल दोडके (२८ वर्षे, हरदासनगर), गोल्डी ऊर्फ प्रशांत रमेश नटिये आणि कमलेश शाहू यांचा समावेश आहे. ५ जानेवारीला वन विभागाच्या नागपूर पथकाला ट्रक क्रमांक एमएच/३१/एफसी/५६१४ मधून अवैध सागवान आणले जात असल्याची माहिती मिळाली. ते सागवान लपविण्यासाठी वरून वांग्याच्या टोपल्या ठेवण्यात आल्या होत्या.
नाकाबंदी केली असता दुसऱ्या दिवशी संबंधित ट्रक कापसी (बु.) परिसरात दिसला. ट्रक थांबवून चौकशी केली असता हा प्रकार निदर्शनास आला. ट्रक चालक भूपेंद्रकडे पुरेशी कागदपत्रे नव्हती. छिंदवाडातील सवरनी, कन्हान वन परिक्षेत्राच्या जंगलातून लाकडे आणल्याची कबुली त्यांनी दिली. या प्रकारात त्यांच्यासोबत अंकित असभागे असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतले असता नटियेच्या गोदामाची माहिती मिळाली. यानंतर किरायाने आरा मशीन चालविणाऱ्या शाहूपर्यंत हा तपास पोहोचला. सर्व आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. काहींची वन कोठडीत आणि काहींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.