लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पाेलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याची माेहीम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गत पारशिवनी पाेलिसांच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत एकूण २६ गुन्ह्यांची नाेंद केली. शिवाय, माेहफुलाच्या चार दारूभट्ट्याही उद्ध्वस्त केल्या. यात एकूण १७ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दारू, दारू तयार करण्याचे साहित्य व वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांचा समावेश आहे, अशी माहिती ठाणेदार संताेष वैरागडे यांनी दिली.
काेराेना संक्रमण आणि लाॅकडाऊन या काळात माेहफुलाची दारूनिर्मिती व अवैध विक्रीला पारशिवनी तालुक्यातील काही भागात उधाण आले आहे. यासंदर्भात लाेकमतमध्ये वृत्तही प्रकाशित करण्यात आले. त्या वृत्ताची दखल घेत पाेलिसांनी अवैध दारूनिर्मिती व विक्रीला आळा घालण्याासाठी कंबर कसली. पारशिवनी पाेलिसांच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत अवैध दारू विक्रेत्यांवर २६ गुन्ह्यांची नाेंद केली. शिवाय, त्यांच्याकडून एकूण १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या पथकाने तालुक्यातील चार ठिकाणी सुरू असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्ट्यांवर धाडी टाकल्या. यात आराेपींविरुद्ध गुन्हे नाेंदविण्यात आले असून, त्यांच्याकडून माेहफुलाची दारू, ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन (सडवा) व इतर साहित्य जप्त केले. माेहफुलाच्या दारूभट्टीवाल्यांकडून ११ लाख १८ हजार रुपये किमतीचे तर दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून ६ लाख ५ हजार रुपये असा एकूण १७ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात चार वाहनांसह दारूचा समावेश आहे, अशी माहिती ठाणेदार संताेष वैरागडे यांनी दिली असून, ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक संदीपान उबाळे, मुदस्सर जमाल, संदीप कडू यांच्या पथकाने केली.