गुन्हेशाखेची कारवाई : ग्वालबन्सीच्या साथीदारांवरही कायद्याचा बडगा नागपूर : कोट्यवधींच्या जमिनी बळकावून कित्येकांना आत्महत्या करण्यास भाग पाडणारा कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या १० ते १५ गुंड साथीदारांविरुद्ध गुन्हेशाखेने एकाच दिवशी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले. त्यात जमिनी बळकावणे आणि विनयभंगाच्या आरोपासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसारही तीन गुन्हे दाखल झाले आहेत. एकाच दिवशी एकाच आरोपीविरुध तीन अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची महाराष्टातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. कुख्यात दिलीप आणि त्याच्या साथीदारांनी भूपेश चंद्रकांत सोनटक्के (वय ४२) नामक सिव्हील इंजिनियरची जमीन हडपली होती. त्यामुळे भूपेश यांनी सहा महिन्यांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावरून १९ एप्रिलला मानकापूर पोलिसांनी भूमाफिया ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंड साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर असाच दुसरा गुन्हा दोन दिवसांपूर्वी गिट्टीखदान ठाण्यात दाखल झाला. त्यामुळे तक्रारकर्त्यांची संख्या अचानक वाढली आहे. ग्वालबन्सीच्या ताटखालचे मांजर समजले जाणारे काही पोलीस आता त्याच्यापासून दूर झाले आणि दबंग पोलीस अधिकाऱ्यांनी ग्वालबन्सीविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केल्याचा विश्वास वाढल्यामुळे झिंगाबाई टाकळीतील वैभवानंद सोसायटी तसेच गोरेवाड्यातील ख्वाजा गरीब नवाज सोसायटी तसेच कोराडीच्या नशेमन सोसायटीतील पीडितांनी तक्रारी नोंदवल्या. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे आणि अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा तसेच उपायुक्त राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर्टीसेलचे वरिष्ठ निरीक्षक वजिर शेख यांनी आज एकाच वेळी मानकापूर ठाण्यात तीन आणि कोराडीत एक असे चार गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)
भूमाफियाविरुद्ध पुन्हा चार गुन्हे दाखल
By admin | Published: April 26, 2017 1:36 AM