लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : शेतातील गाेठ्याला अचानक आग लागली आणि आत बांधलेल्या गुरांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे या आगीतील गाेठ्यातील चार गुरांचा हाेरपळून मृत्यू झाला. यात बैलजाेडीसह गाय व वासराचा समावेश आहे. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भिष्णूर शिवारात रविवारी (दि. २५) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.
गजानन नासरे, रा. भिष्णूर, ता. नरखेड यांची भिष्णूर शिवारात शेती आहे. शेतातच गाेठा असून, त्यांची सर्व जनावरे नेहमीप्रमाणे त्या गाेठ्यात बांधली हाेती. दरम्यान, दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्या गाेठ्याने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळीकडे धाव घेत आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. मात्र, आग नियंत्रणात येईपर्यंत आतील गुरांना गाेठ्याबाहेर पडणे शक्य न झाल्याने आत असलेल्या बैलजाेडी, गाय व वासराचा हाेरपळून मृत्यू झाला.
शिवाय, या आगीत गाेठ्यातील शेतीपयाेगी साहित्य व गुरांचे वैरण पूर्णपणे जळाल्याने किमान १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती गजानन नासरे यांनी दिली. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी हिंमत बानाईत यांनी मृत गुरांची उत्तरीय तपासणी प्रक्रिया पार पाडली. माहिती मिळताच पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, पाेलीस कर्मचारी अरविंद जाधव, जाेशी, तलाठी नाखले यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. आग पीडित शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.