नागपूर : येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील चार थॅलेसेमियाग्रस्त मुलांना चार मुलांना रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे सामोर आले आहे असून यातील एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली, या प्रकरणात चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
या प्रकरणात गठित केलेल्या समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राज वाघमारे यांच्यासह एफडीएतील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. समितीने पहिल्या टप्यांत गुरुवारी थॅलेसेमिया, सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांची भेट घेत या प्रकरणाची माहिती घेतली. या मुलांना कोणत्या रक्तपेढीतून रक्ताचा पुरवठा झाला, हे समितीने जाणून घेतले. आरोग्य उपसंचालक कार्यालयाने तातडीने या समितीला चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.
थॅलेसेमिया हा रक्ताचा एक आनुवांशिक आजार आहे. या आजाराच्या रुग्णांमध्ये सामान्यांच्या तुलनेत लाल रक्तपेशींची संख्या कमी असते. कमी हिमोग्लोबीन आणि फार कमी लाल रक्त पेशींमुळे रुग्णाला खूप जास्त थकवा येतो. या लाल रक्तपेशी फार गतीने नष्टही होतात. यामुळे दर १५ दिवसांनी रुग्णाला रक्त द्यावे लागते. सरकारकडून थॅलेसेमिया व सिकलसेलग्रस्तांना खासगी व शासकीय रक्तपेढीतून मोफत रक्त देण्याचा नियम आहे. परंतु हे रक्त ‘नॅट टेस्टेड’ नसल्याने थॅलेसेमिया व सिकलसेलग्रस्तांना ‘एचआयव्ही’ व ‘हेपॅटायटीस सी’ व ‘बी’ चा धोका निर्माण झाला आहे.