नागपूर : मोबाईल टॉवरसाठी वापरण्यात येत असलेले १८ लाखांचे हार्डवेअर चोरी करणाऱ्या प्रकरणांतील चार महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिला अजनी येथील रहाटे नगर टोली येथून असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचे हे कृत्य समोर आले होते. सीमा दयाल मानकर (५०), सीमा सागर मानकर (३१), रीमा किसन लोंढे (२०) व सरिता सूरज लोंढे (२५) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. या चारही महिला चार दिवसांअगोदरच तुरुंगातून जामिनावर सुटल्या होत्या.
प्लॉट क्रमांक ३९६, योगेश्वरनगर येथील रहिवासी अक्षय माधवराव ईलमे (३५) हे जियो कंपनी येथे टॉवर मेंटेनन्सचे काम करतात. त्यांच्या घराच्या बाजूला टिनाच्या पत्र्यांचे शेड आहे. त्यात ते टॉवर मेन्टेनन्सचे सामान ठेवतात. २ नोव्हेंबर रोजी त्यांनी शेड उघडले असता त्यात रेडिओ रिमोट हेडचे २६ नग गायब होते. त्यांची किंमत १८ लाख २० हजार इतकी होती. मोबाईल टॉवरमधील हे महत्त्वाचे हार्डवेअर मानण्यात येते. ईलमे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात सात अनोळखी महिला चोरी करत असल्याचे दिसून आले. त्यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला. महिला उपकरणे विकण्यासाठी एखाद्या कबाडी व्यापाऱ्याकडे जातील हे पोलिसांना माहीत होते. त्यांनी व्यापाऱ्यांवर पाळत ठेवली. एका महिला गुन्हेगाराने उपकरणे विकण्यासाठी सोनेगाव येथील कबाडी व्यापाऱ्याला गाठले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
चोरी व घरफोडीत अगोदरही सहभाग
आरोपी महिलांचा अगोदरदेखील चोरी आणि घरफोडीमध्ये सहभाग होता. घटनेच्या चार दिवस आधी त्यांची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. ईलमेने शेडमध्ये ठेवलेल्या हार्डवेअरची त्यांना माहिती मिळाली. सहा महिलांनी परिसरात पहारा दिला तर एक महिला आत गेली. आत गेलेल्या महिलेने इतर आरोपींना उपकरणे दिली व सर्व उपकरणे पोत्यामध्ये भरून महिला काही अंतरापर्यंत चालत गेल्या. त्यानंतर त्या ऑटोतून फरार झाल्या.