नागपूर : चार दिवसांपासून बंद असलेले नागपूर विभागातील रेतीचे डेपो शनिवारपासून खुले झाले आहेत. त्यामुळे बांधकामावर रेती उपलब्ध होऊ लागली आहे.
विविध शुल्कासह एक ब्रास (क्युबिक फूट) रेतीचा दर ६७६.५२ रुपये असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काही दिवसांआधी दिली होती. पण त्यावेळी रॉयल्टीचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे डेपोमुळे ग्राहकाला रेतीचे दर कमी असल्याची जाणीव झाली होती. पण रॉयल्टीमुळे पाच ब्रास रेतीच्या ट्रकसाठी ६५०० रुपयांवर मोजावे लागत आहे. तसेच वाहतुकीच्या खर्चासह रेतीचा ट्रक २० ते २१ हजार रुपयांत ग्राहकाला खरेदी करावा लागत आहे.
रेतीच्या अवैध उत्खननाचे समर्थन करता येणार नाही, पण आधी नदीच्या घाटावर रेतीचे अवैध उत्खनन करून ग्राहकाला दारात मिळणाऱ्या रेतीचे दरही प्रति ट्रक २२ ते २५ हजार रुपये होते. आता २० ते २१ हजार रुपये द्यावे लागत आहे. त्याकरिता ग्राहकाचा आधार कार्ड महत्त्वाचा ठरत आहे. एका ग्राहकाला महिन्यात १० ब्रास अर्थात दोन ट्रक रेती मिळत आहे. या सर्व प्रक्रियेमुळे सरकारच्या रेती डेपो धोरणाचा फायदा नागपूर विभागात होताना दिसत नसल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
वाहतुकीचा दर पूर्वीचाचसरकार ब्रासमध्ये रेती विकत आहे. मात्र डेपोतून ग्राहकांच्या दारात रेती पोहोचविण्यासाठी वाहतुकीची खासगी यंत्रणा आहे. सर्व वाहतूकदार ठरलेल्या दरानुसारच दर आकारत आहेत. ग्राहकाला एका ट्रकमधील रेतीच्या किमतीपेक्षा तीनपट जास्त शुल्क वाहतुकीसाठी द्यावे लागत आहे. डिझेल, ड्रायव्हर व कामगाराचा खर्च, ट्रकची देखभाल-दुरुस्ती, नफा आदींसह वाहतुकीचे दर किफायत असल्याचे वाहतूकदारांचे मत आहे.