हिंगणा / नागपूर : सेप्टिक टँकचे चेंबर साफ करण्यास उतरलेल्या चौघांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला. मृतात बापलेकाचा समावेश असून, त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. अवघ्या पंचक्रोशीला हादरा देणारी ही दुर्दैवी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनीच्या विनोबानगरात मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.विनोबानगरातील कृष्ण विहार अपार्टमेंट यू-२ च्या मागील बाजूस असलेल्या सेप्टिक टँकचे चेंबर चोक झाले होते. ते साफ करण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्याने काही मजुरांना बोलविले. भाव ठरल्यानंतर सुनील नेकराम वाल्मिकी (५०), त्याचा मुलगा विक्की (१८), सुमीत दिनेश चव्हाण (३०, तिन्ही रा. वैशालीनगर, डिगडोह) तसेच बाल्या नामदेव मसादे (३५, रा. इंदिरामातानगर, डिगडोह) आणि प्रमोद हरीया चव्हाण (३५, रा. वैशालीनगर) यांनी साहित्याची जुळवाजुळव केली. त्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास एक जण आतमध्ये उतरला. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने दुसऱ्याला आवाज दिला. या दोघांच्या पडण्याचा आवाज आल्याने तिसरा आतमध्ये गेला. बराच वेळ होऊनही तिघांची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने आणि आवाज देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चौथा आतमध्ये गेला. त्याचेही तसेच झाले. दरम्यान, वारंवार आवाज देऊन कुणाकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रमोदला शंका आली. त्याने आजूबाजूच्यांना सावध करीत आतमध्ये पाऊल ठेवले. काही वेळेतच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने बाजूच्यांना गडबड असल्याचे संकेत दिले. ते लक्षात घेत चेंबरजवळ असलेल्यांनी प्रमोदला तातडीने वर ओढले. तो बेशुद्ध पडल्याचे पाहून उपस्थित रहिवाशांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर एमआयडीसी पोलीस तसेच अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अत्यंत सावधगिरीने आतमधील चौघांना बाहेर काढण्यात आले. सुनील त्याचा मुलगा विक्की, सुमीत आणि बाल्या या चौघांचा मृत्यू झाला होता. अत्यवस्थ असलेल्या प्रमोद चव्हाणला लता मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ( प्रतिनिधी)परिसरात तणावया घटनेचे वृत्त परिसरात कळताच अल्पावधीतच घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळताच ठाणेदार निरीक्षक विष्णू भोये, सहायक निरीक्षक प्रभाकर शिरुळकर, उपनिरीक्षक डी. के. वाघ, दिलीप ठाकरे, रवी फाळके, विनायक पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे आणि सहायक आयुक्त माने हे देखिल घटनास्थळी पोहचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी वाडी आणि प्रतापनगर पोलिसांचा ताफाही घटनास्थळी बोलवून घेतला.
सेप्टिक टँकमध्ये चौघांचा मृत्यू
By admin | Published: March 16, 2016 8:39 AM