अन्यथा अधिकारी दाबणार ‘नोटा’ : इव्हीएमला यावेळी ‘एण्ड कॅप’ नाही कमलेश वानखेडे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला आता चार मतदान करावेच लागणार आहे. निवडणूक आयोगाने इव्हीएमच्या रचनेत बदल केला असून, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दाबण्यात येणारी ‘एण्ड कॅप’ची बटनच रद्द केली आहे. त्यामुळे एखाद्या मतदाराने फक्त तीनच मतदान केले तर मतदानाची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. अशा परिस्थितीत उमेदवाराला चौथे मत द्यायचे नसल्यास त्याला ‘नोटा’ बटन दाबावेच लागेल. मतदाराने तसे न केल्यास निवडणूक अधिकारी मतदारासमक्ष स्वत: नोटाचे बटन दाबतील. कायद्याने निवडणूक अधिकाऱ्यांना तसा अधिकार देण्यात आला आहे. महापालिकेची गेली निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली. एका प्रभागात दोन मते द्यायची होती. समजा एखाद्या प्रभागातील एका बूथवर एकूण १०० मतदान झाले तर ‘अ’ जागेवर लढणाऱ्या एकूण उमेदवारांच्या मतांची बेरीज १०० यायला हवी. ५६ पेक्षा जास्त उमेदवार झाल्यास तांत्रिक अडचण एका इव्हीएमवर जास्तीत जास्त १६ बटन असतात. यापैकी एक जागा संवर्गाच्या पट्टीसाठी तर शेवटची जागा ‘नोटा’ बटनसाठी सोडली जाते. त्यामुळे एका मशीनवर १४ उमेदवारांची नावे येऊ शकतात. एका कंट्रोल युनिटला फक्त चार मशीन जोडल्या जाऊ शकतात. त्यामुळे एकूण ५६ उमेदवारांची नावे एका कंट्रोल युनिटवर येऊ शकतात. एखाद्या प्रभागात चार जागांसाठी एकूण ५६ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील तर मात्र तांत्रिक अडचण निर्माण होणार आहे. एकाच कंट्रोल युनिटवर पाचवी मशीन जोडणे शक्य नसल्यामुळे दुसरे स्वतंत्र कंट्रोल युनिट लावावे लागणार आहे. तसे झाले तर मतदान प्रक्रिया आणखी किचकट होईल व निवडणूक अधिकाऱ्यांसह मतदारांचीही डोकेदुखी वाढेल.
चारही मतदान सक्तीचे
By admin | Published: February 08, 2017 2:49 AM