शाळेची जमीन हडपली : ५० लाखांच्या खंडणीचे प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ५० लाख रुपयांची खंडणी मिळावी म्हणून एक चांगली चालणारी शाळा बंद पाडणाऱ्या आणि त्या शाळेच्या मालमत्तेवर कब्जा करणाऱ्या कुख्यात जर्मन जपान टोळीतील चार गुंडांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. अजहर खान रशीद खान (वय ३३), अमजद खान रशीद खान (वय ३५), राजा खान रशीद खान (वय ३२) आणि जावेद अन्सारी अब्दुल वहाब अन्सारी (वय ४८) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.शमसुन्निसा पठाण (वय ६२) यांचे पती मोहम्मद ईस्माईल पठाण यांनी जाफरनगरात रसूल प्राथमिक शाळा सुरू केली होती. ईस्माईल यांचे निधन झाल्यानंतर आरोपी जर्मन जपान टोळीने जानेवारी २०११ मध्ये या शाळेच्या काही जागेवर अनधिकृत कब्जा केला. वर्षभरानंतर ही शाळा बंद पाडून या टोळीने संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेतली. शाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर विद्यार्थ्यांनाही जर्मन जपान टोळीचे गुंड धमकावू लागले. याबाबत निराधार शमसुन्निसा यांनी या गुंडांकडे आर्जव विनंत्या केल्या असता गुंडांनी त्यांना ५० लाखाची खंडणी मागितली. ती दिली नाही म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी शमसुन्निसा यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, या टोळीसोबत पोलिसांची भागीदारी असल्यासारखे तत्कालीन पोलीस वागले. त्यामुळे दहशतीत आलेल्या शमसुन्निसा यांनी गप्प बसणेच पसंत केले. भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीविरुद्ध शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केल्यामुळे धीर मिळालेल्या शमसुन्निसा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर २० मे रोजी या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यावेळी केवळ वसीम ऊर्फ शेरा नामक आरोपीच पोलिसांच्या हाती लागला. अन्य आरोपी फरार होते. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने उपरोक्त चार आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांना गुरुवारी कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना १७ जूनपर्यंत पीसीआर मंजूर केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. पाटील यांनी ही कामगिरी बजावली.फरार आरोपीही पकडणारजर्मन जपान या टोळीतील गुंडांविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून अनेक आरोपी फरार आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा पोलिसांचा दावा आहे.
जर्मन-जपान टोळीचे चार गुंड गजाआड
By admin | Published: June 16, 2017 2:09 AM