नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी झालेल्या पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत (Gadchiroli encounter ) जखमी झालेल्या चार पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी सायंकाळी ५.३० वाजता दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती स्थिर, तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रवींद्र नेताम (४२), सर्वेश्वर डी. आत्राम (३४), महारू कुडमेथे (३४) व टिकाराम कटांगे (४१) अशी जखमी जवानांची नावे आहेत. ऑरेंज सिटी हॉस्पिटलने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जवान नेताम व कटांगे यांची प्रकृती गंभीर असून जवान आत्राम व कुडमेथे यांची प्रकृती स्थिर आहे. नेताम यांच्या कानाला व डोक्याला चाटून बंदुकीची गोळी गेली, तर कटांगे यांच्या उजव्या हातात बंदुकीची गोळी अडकलेली आहे. या दोघांवरही तातडीचे उपचार सुरू आहेत.
आत्राम यांच्या उजवा पाय व पाठीला चाटून बंदुकीची गोळी गेली तर, कुडमेथे यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला चाटून बंदुकीची गोळी गेली आहे. यांच्यावर रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार यांच्या मार्गदर्शनात क्रिटिकल केअर युनिटचे डॉ. राजेश अटल, डॉ. समीर जहागीरदार, डॉ. निर्भय करंदीकर, डॉ. पलक जयस्वाल, डॉ. निशिकांत लोखंडे, डॉ. मनीष अग्रवाल आदी डॉक्टरांचे पथक उपचार करीत आहे.