लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा रोड, कापसी खुर्द येथील चार आरामशीनला शनिवार रात्री २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत आरा मशीन्ससह कोट्यवधी रुपयांचा सागवान जळून खाक झाले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.आरामशीनमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड असल्यामुळे आगीचे लोण चांगलेच पसरले. शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कळमना, लकडगंज, गणेशपेठ, सिव्हिल लाईन्स, सुगतनगर येथील अग्निशमन केंद्रावरील १० गाड्या आग विझविण्यासाठी लागल्या होत्या. अग्निशमन विभागातील सूत्रानुसार योगेश पटेल यांच्या सारंग टिंबर ट्रेडिंग कंपनीच्या चार मशीन व सागवान जळाल्यामुळे सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले. यासोबतच अश्विन मदनलाल पटेल यांच्या मे. सिद्धी विनायक टिंबर मार्टमधील पाच मशीन व सागवान जळाल्याने सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. भगवान हिवराज पटेल यांच्या मे. रत्नानी टिंबर कंपनीचे ६० लाख रुपयांचे व हेमंत शांतिलाल पटेल यांच्या मे. शांतिलाल मनी पटेल अॅण्ड कंपनीचेही आगीमुळे मोठे नुकसान झाले.दिवाळीमुळे आरा मशीनवरील कामगार सुटीवर गेले होते. त्यामुळे मशीन सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे सिंगल फेज लाईनमध्ये शार्ट सर्किट होण्याची शक्यता कमी आहे. आग लागण्याचे इतर कोणते कारण असू शकते हे कळलेले नाही. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम सिद्धी विनायक टिंबरकडे आगीच्या ज्वाला दिसल्या. यानंतर आग वेगाने सारंग टिंबर व अन्य आरामशीनमध्ये पसरली. चौकीदारांनी मालकांना आग लागल्याचे कळविले. यानंतर त्वरित अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. अग्निाशमन अधिकारी मोहन गुडधे यांच्या नेतृृत्वात पथकाने सकाळी ७ पर्यंत आग नियंत्रणात आणली. यानंतर शेजारच्या आरामशीनमधील लाकडे जेसीबीच्या साहाय्याने दूर सारण्यात आली. मात्र, आग विझल्यानंतरही धूर निघणे सुरूच होते. त्यामुळे अग्निशमन बंब घटनास्थळी तैनात ठेवण्यात आले होते.
कापसीत चार आरामशीनला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 1:51 AM
भंडारा रोड, कापसी खुर्द येथील चार आरामशीनला शनिवार रात्री २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत आरा मशीन्ससह कोट्यवधी रुपयांचा सागवान जळून खाक झाले.
ठळक मुद्देकोट्यवधींचे सागवान खाक : नेमक्या कारणाचा खुलासा नाही