सायको हल्लेखोर : इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्सचा वापर जगदीश जोशी नागपूरसायको हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांच्या रडारवर चार लाख मोबाईल नंबर आहेत. पोलिसांनी मोबाईल कंपन्यांकडून या नंबरवरील कॉल्सचा डाटा प्राप्त केला आहे. याची तपासणी करीत सायको हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. सायको हल्लेखोराने गेल्या सव्वा महिन्यापासून शहर पोलिसांना हादरवून सोडले आहे. अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मागील १५ दिवसांपासून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी दक्षिण नागपुरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. स्थानिक पोलिसांसोबतच गुन्हे शाखेची चमूसुद्धा तैनात आहे. ‘हनी ट्रॅप’ लावण्यात आला आहे. यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सायको हल्लेखोराचा कुठलाही पुरावा मिळत नसल्याने पोलीस इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्सची मदत घेत आहे. मोनिका किरणापुरे हत्याकांड, लखोटिया बंधू हत्याकांडासारखे गंभीर प्रकरण इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्सच्या मदतीनेच सोडविण्यात आले होते. यामुळेच सायको हल्लेखोराला पकडण्यासाठी या दिशेने काम सुरू करण्यात आले आहे. सूत्रानुसार पोलीस घटनेच्या वेळी घटनास्थळ परिसरात मोबाईलवर झालेल्या संभाषणाचे कॉल्स तपासून पाहत आहे. या दरम्यान जवळपास चार लाख कॉल्स झाल्याची माहिती आहे. यात संशयास्पद कॉल्स किंवा मॅसेजचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांच्या रडारवर चार लाख मोबाईल नंबर
By admin | Published: February 14, 2017 2:03 AM