लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या पेंचच्या २३०० मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर पाच ठिकाणी सुरु असलेल्या गळतीपैकी चार ठिकाणी असलेली गळती दुरुस्त करण्यात आलेली आहे. तसेच ज्या सात ठिकाणी फ्लो मीटर बसवावयाचे होते त्यापैकी चार ठिकाणी फ्लो मीटर लावण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
पेंच पासून नागपूरला पाणी पुरवठा करण्यासाठी २७ किमीची लांबीची २३०० मी.मी. व्यासाची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. या पाईप लाईनवरुन मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. गळती दुरुस्त करण्यासाठी नागपूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
स्थायी समिती व जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके यांनी गुरुवारी रोहणा, इटगांव येथे सुरु असलेल्या लिकेज दुरुस्तीची पाहणी केली. तसेच गोरेवाडा बीपीटी, महादुला रॉ वॉटर पपिंग स्टेशनमध्ये फ्लो मीटर बसविण्याचे कामाचे निरीक्षण केले. त्यांनी तातडीने सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, उप अभियंता प्रमोद भस्के उपस्थित होते.