लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामाच्या निविदेदरम्यान गैरव्यवहार केल्याप्रकरणी नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वेगवेगळे चार गुन्हे दाखल केले. या गैरप्रकारात जलसंपदा विभागातील तत्कालीन अभियंते, लेखाधिकारी, कार्यकारी संचालकांनी कंत्राटदार आणि त्यांच्या भागीदारांचे संगनमत उघड झाल्यामुळे एसीबीने चार प्रकरणात १७ जणांना आरोपी बनविले आहे. या घडामोडीमुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.राज्याच्या गृह विभागाच्या आदेशानुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात उघड चौकशीचे आदेश एसीबीला गेल्या वर्षी देण्यात आले होते. त्यानुसार, एसीबीच्या महासंचालकांनी (मुंबई) एसीबी नागपूरचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वात चौकशी पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने आपला विस्तृत चौकशी अहवाल तयार केल्यानंतर वरिष्ठांकडे सादर केला. त्यानंतर आज १८ आॅगस्टला सदर पोलीस ठाण्यात वेगवेगळे चार गुन्हे दाखल करून एकूण १७ जणांना आरोपी बनविण्यात आले. प्रत्यक्षात आरोपींची संख्या सहा आहे. मात्र, त्यांचा प्रत्येक गुन्ह्यातील सहभाग पकडता ही संख्या १७ वर पोहचली आहे.पहिला गुन्हागोसेखुर्द उजवा मुख्य कालवा कि.मी. ७८ ते ९० मधील मातीकाम व त्यावरील बांधकामे तसेच ३१ ते ९० मधील अस्तरी करण्याचे काम (साधारणत: ७५,४०० मि. ते ७६१८० मीटर वगळून) निविदा प्रक्रिये दरम्यान नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदा कामाचे मूल्य वाढविले. अवैध/निम्न स्तरावर निविदेचे अद्ययावतीकरणास कार्यकारी संचालक यांनी मंजुरी/स्वीकृती दिली. या गैरव्यवहारास तत्कालीन विभागीय लेखाधिकारी गुरूदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी आणि देवेंद्र पुरुषोत्तम शिर्के हे जबाबदार असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.दुसरा गुन्हागोसेखुर्द उजव्या कालव्यावरील बी-१ ब्रांच ८००१ ते १७०० किमीमधील मातीकाम आणि बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढविले. अवैध/निम्नस्तरावर निविदेच्या अद्ययावतीकरणास मंजुरी दिली. या गैरव्यवहाराला तत्कालीन विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी तसेच कार्यकारी संचालक रो. मा. लांडगे हे जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले.तिसरा गुन्हागोसेखुर्द उजव्या कालव्यावरील घोडाझरी शाखा कालवा सा. क्र. २५७९० वरून निघणारा घोडाझरी उपशाखा क्रमांक १ चे ० ते २६ किलोमीटरमधील मातीकाम आणि त्यावरचे अस्तरीकरण वगळून बांधकाम झाले. या कामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान कार्यकारी अभियंता ललित इंगळे, विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी आणि कार्यकारी संचालक दे. पा. शिर्के यांनी पदाचा गैरवापर करून गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले.चौथा गुन्हागोसेखुर्द उजवा मुख्य कालवा सा.क्र. ८७००० मीटरवरून निघणारा शाखा कालवा क्रमांक ५ च्या ० ते ४.९५ किमी मातीकाम, अस्तरीकरण तसेच बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान तत्कालीन विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी आणि देवेंद्र पुरुषोत्तम शिर्के यांनी पदाचा दुरुपयोग करून गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाल्याने या सर्वांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम १३ (१, क, ड) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.आतापर्यंत २० गुन्हे दाखलएसीबीने यासंबंधाने दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्या २० झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०१६ मध्ये क्रमश: (एक आणि एक) असे दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर एप्रिल २०१७ मध्ये दोन गुन्हे दाखल झाले. डिसेंबर २०१७ मध्ये चार, फेब्रुवारी २०१८ मध्ये सहा, जुलै २०१८ मध्ये दोन आणि आज १८ आॅगस्ट २०१८ ला चार गुन्हे दाखल झाल्याने ही संख्या २० झाली आहे. अत्यंत किचकट अशी ही चौकशी एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्र्र नागरे, उपअधीक्षक मिलिंद तोतरे, उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी केली.