नागपूर : स्वाईन फ्लू मृत्यूचे सत्र सुरूच असताना वातावरणात पुन्हा बदल झाल्याने नागपूरकर दहशतीत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री एका ५० वर्षीय रुग्णाचे खासगी इस्पितळात तर शनिवारी सकाळी मेडिकलमध्ये एका महिलेसह आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. स्वाईन फ्लूच्या बळीची संख्या ५८ झाली आहे. कल्पना वंजारी (४५) रा. नंदनवन व कमल जयस्वाल (५०) रा. बैतुल, मध्यप्रदेश, नरेश साळुंखे (६५) गणेशपेठ व आशिफा बेगम(४०) रा. आदिलाबाद, आंध्रप्रदेश असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात कल्पना वंजारी यांना भरती करण्यात आले. शुक्रवारी त्यांचे नमुने पॉझिटीव्ह आले. शनिवारी सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमल जयस्वाल हा रुग्ण मागील काही दिवसांपासून आॅरेंज सिटी इस्पितळात उपचार घेत होता. शुक्रवारी मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नरेश साळुंखे यांचा मृत्यू मेयो रुग्णालयात तर आशिफा बेगम यांचा मृत्यू सावंगी मेडिकल हॉस्पीटलमध्ये झाला. मेडिकलमधून आज १२ स्वाईन फ्लू संशयितांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यात दोन व पाच वर्षाच्या बालिकेसह सात रुग्ण पॉझिटीव्ह आले. (प्रतिनिधी)स्वाईन फ्लू वॉर्डात ४४ रुग्ण भरतीसध्या मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २५ संशयित व १२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर लहान मुलांच्या स्वाईन फ्लू वॉर्डात चार पॉझिटीव्ह व तीन संशयित रुग्ण भरती आहेत.सहायक संचालकाला स्वाईन फ्लूनागपूर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांनी नमुन्याची तपासणी केली असता पॉझिटीव्ह आढळून आले. सध्या ते एका खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. या घटनेला घेऊन कार्यालयात खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी धास्तावले आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मेडिकलचे काही डॉक्टरही पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे.
स्वाईन फ्लूचे आणखी चार बळी
By admin | Published: March 01, 2015 2:28 AM