फहीम खान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील वायुप्रदूषणाचा स्तर बराच कमी असल्याचे नेहमीच सांगितले जाते. शहरात आतापर्यंत पाच हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता तपासली जाते. आता पुन्हा नव्याने चार केंद्र उभारले जाणार आहेत. परंतु त्यासाठी निश्चित करण्यात आलेले ठिकाण लक्षात घेता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डला खरोखरच प्रदूषण तपासायचे आहे की निव्वळ औपचारिकता करायची आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र उभारण्यासाठी शहरातील चार क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. मात्र निवडलेली ही ठिकाणे सिव्हिल लाईन्सलगतच्या परिसरातील आहेत. सध्या शहरात असलेल्या पाच केंद्रांपैकी दोन सिव्हिल लाईन्समध्येच आहेत. अशातच पुन्हा नवे केंद्रही याच परिसरात उभारले जात असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.
पाच केंद्र असूनही माहिती एकाच केंद्रातून
शहरात हवा गुणवत्ता तपासणी केंद्र पाच आहेत. या सर्व केंद्रांवर नोंदविण्यात आलेली माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या वेबसाईटवर अपलोड करावी लागते. परंतु फक्त विभागीय आयुक्त कार्यालयातील केंद्रावरील आकडेच वेबसाईटवर अपलोड होतात. अन्य चार केंद्रांवरून कसलीही माहिती पाठविली जात नाही. त्यामुळे सध्या तरी या एकाच केंद्रावरील नोंदी म्हणजे संपूर्ण शहरातील प्रदूषणाची नोंद समजली जात आहे.
शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या चार केंद्रांपैकी दोन केंद्र भांडेवाडी आणि दिघोरी या परिसरात उभारायला हवी, तरच संपूर्ण नागपूर शहराचे प्रदूषण किती आहे, हे कळू शकेल. सिव्हिल लाईन्सच्या परिसरातील केंद्रांवरून प्रदूषणाचा खरा स्तर कळणे अशक्य आहे.
- कौस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजिल
येथे आहेत जुने केंद्र
सिव्हिल लाईन्स, विभागीय आयुक्त कार्यालय, उत्तर अंबाझरी रोड, हिंगणा रोड आणि सदर
येथे उभारणार नवे केंद्र
शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय, मनपाचा महालमधील टाऊन हॉल, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी अमरावती रोड आणि व्हीएनआयटी कॉलेज.
...