नागपूर : दुबईहून नागपुरात परतलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ‘एम्स’मध्ये स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. या रुग्णांसह नागपूर जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, १२ दिवसांनंतर रुग्णसंख्येचा दुहेरी आकडा पुढे आला. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,७६८ तर मृतांची संख्या १०,१२२वर स्थिर आहे.
दुबई प्रवाशाची पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये ४० व २९ वर्षांच्या दोन महिला, तर २९ वर्षांचा पुरुष व ११ वर्षांच्या मुलगा आहे. यातील २९ वर्षीय पुरुषाला लक्षणे असून इतर तिघांना लक्षणे नाहीत. मनपाच्या आरोग्य विभागाने या चारही प्रवाशांना ‘एम्स’मध्ये दाखल केले. या प्रवाशांना ओमायक्रॉन संशयित म्हणून पाहिले जात असल्याने त्यांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविले जाणार आहेत. या अहवालाकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
- शहरात १२ तर ग्रामीणमध्ये १ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात आज ४,२११ चाचण्या झाल्या. यात शहरातील १२ तर ग्रामीणमधील १ असे १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपूर जिल्ह्यात ९ डिसेंबर रोजी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज तब्बल १२ दिवसांनंतर रुग्णसंख्येचा दुहेरी आकडा दिसून आला. रुग्ण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ४९ झाली आहे. यात शहरातील ३९, ग्रामीणमधील ७, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत.