गुन्हे शाखेची कारवाई : आरोपी दिवाकर, आशू व खुशालसह इतर फरारनागपूर : त्रिमूर्तिनगर येथील बिल्डर अजय श्यामराव राऊत यांचे अपहरण करून पावणेदोन कोटी रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या दिवाकर गँगच्या चार आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) रंजनकुमार शर्मा व एसीपी नीलेश शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. नितीन सुनील वाघमारे (२७) रा. कामठी रोड भिलगाव, आशिष वीरेंद्र नायडू (२८) रा. बेलिशॉप पाचपावली, कार्तिक शिवरामकृष्णन तेवर (२७) रा. ख्रिश्चन कॉलनी, जरीपटका, भरत ऊर्फ राहुल सुशील दुबे (२३) रा. भोसलेवाडी मोतीबाग, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गँगचा प्रमुख दिवाकर बबन कोत्तुलवार (३१) रा. मनीषनगर आणि त्याचा भाऊ आशिष बबन कोत्तुलवार (२८), खुशाल ऊर्फ जल्लाद (पहेलवान) थूल (२५) रा. गड्डीगोदाम यांच्यासह इतर आरोपींचा शोध सुरू आहे.स्पोर्टस् कार केली जप्त नागपूर : राऊत यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली एमएच/०२/एमए/४६९१ क्रमांकाची स्पोर्टस् कार तपास पथकाने जप्त केली. मंगळवारीच आरोपींची विचारपूस केली असता, दिवाकर व इतर आरोपींची माहिती मिळाली असून तेव्हापासून ते फरार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच दिवाकर व त्याचा भाऊ आशू आणि त्याचे इतर साथीदार भुल्लर हत्याकांडप्रकरणी जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. तर खुशाल आणि जल्लाद गड्डीगोदाम येथील मनपा कंत्राटदार कमलेश जनबंधूच्या खुनाच्या आरोपातून काही महिन्यांपूर्वीच सुटले होते.त्रिमूर्तीनगर येथील अजय राऊत ११ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी ३ वाजता दुचाकी वाहनाने कॉसमॅस चौकातून घरी जात होते. दरम्यान पांढऱ्या रंगाच्या स्कार्पियो आणि लाल रंगाच्या एका स्पोर्ट्स कारने आरोपी आले आणि त्यांनी राऊत यांची दुचाकी अडविली. राऊत यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांचे अपहरण केले. त्यांना आरोपींनी खूप मारहाण केली. त्यांच्या मुलासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. परंतु आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगून राऊतने १ कोटी ७५ लाख रुपयाची खंडणी दिली. ही रक्कम जमविण्यासाठी त्यांनी आपल्या अनेक मित्रांशी व परिचितांशी संपर्क साधला. जरीपटका येथील हरचंदानी, इतवारीतील व्यापारी मुणोत यांनी त्याला ७५ लाख रुपये आणि सक्करदरा येथील गुन्हेगार राजू भद्रे याने त्याला एका तासात एक कोटी रुपयांची मदत केली. यानंतर अपहरणकर्त्यांनी राऊत यांना रात्री उशिरा वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्लू मागे सोडले. मुलगा आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राऊत यांनी आपल्या अपहरणाची व खंडणीची तक्रार दाखल केली नाही. परंतु गुन्हे शाखेला मात्र याबाबत माहिती मिळाली. (प्रतिनिधी)भद्रेने कुठून दिले एक कोटी रुपये राजू भद्रे याने बिल्डर अजय राऊतला एक कोटी रुपये कुठे आणि कसे दिले ? आणि खंडणीची ही रक्कम आरोपींनी कुठे पोहोचविली याची सखोल चौकशी केली जात आहे. दिवाकर कोत्तुलवार गँगने बिल्डर राऊतचे अपहरण केले. तर राजू भद्रेने त्यासाठी एक कोटी रुपये का व कसे जमवून दिले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर या अपहरणाच्या मागील मुख्य सूत्रधार किंवा मास्टर मार्इंड कोण ?, सूत्रधारांनी कुणाच्या माध्यमातून खंडणीची रक्कम स्वीकारली. यात आणखी किती आरोपींचा सहभाग आहे, हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे. भद्रे सध्या पिंटू शिर्के हत्याकांड प्रकरणात तुरुंगात आहे. जामीन रद्द करण्याचा प्रयत्न या प्रकरणात काही दिवसांपूर्वी दिवाकरला गुन्हे शाखा पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी बोलावले होते. परंतु तेव्हा तो पोलिसांची दिशाभूल करण्यात यशस्वी ठरला होता. अपहरणात सहभागी असलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची १९ व २० जानेवारी रोजी मकोका न्यायालयात तारीख होती. आरोपी अटकेच्या भीतीने न्यायालयात उपस्थित झाले नाही. त्यांचा जामीन रद्द करण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहे.
बिल्डरचे अपहरण करणारे चौघे अडकले
By admin | Published: January 21, 2016 2:33 AM