नागपूर : चाकु आणि तलवार घेऊन फिरणाऱ्या चार आरोपींना शहर पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात अटक करून गजाआड केले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ ने कोराडी ठाण्याच्या हद्दीत कोराडी नाका साई ट्रेडर्स मागील परिसरात कारवाई करून आरोपी राजीक शेख रफिक शेख (३२, रा. जयभिमनगर महादुला) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ३०० रुपये किमतीचा एक धारदार लोखंडी चाकु जप्त करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने मानकापूर ठाण्याच्या हद्दीत मानकापूर उड्डाणपुलाखाली घाटाजवळ मिळालेल्या गोपनिय माहितीवरून कारवाई केली.
घटनास्थळी आरोपी सुशील सुरेश बोपचे (२५, रा. ताजनगर झोपडपट्टी) याला २०० रुपये किमतीच्या एका लोखंडी चाकुसह अटक करण्यात आली. यशोधरानगर पोलिसांचे पथक रविवारी रात्री गस्त घालत असताना बंदे नवाजनगर येथे आरोपी अखिल कुरेशी अयुब कुरेशी (२४, रा. बंदे नवाजनगर) हा हातात लोखंडी हत्तीमार चाकु घेऊन धुमाकुळ घालताना आढळला. त्याच्या ताब्यातून २०० रुपये किमतीचा हत्तीमार चाकू जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान, यशोधरानगर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना यादवनगर हाऊसिंग बोर्ड सोसायटीत सुरज किराणाजवळ आरोपी हातात तलवार घेऊन धुमाकुळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी मोहम्मद जिशान मोहम्मद खलील उर्फ बाबा लंगडा (२४) यास ५०० रुपये किमतीच्या तलवारीसह अटक केली. सह पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध कलम ४, २५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.