नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पवनी बफर क्षेत्रातील सिल्लारी बिटाजवळील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचा अखेर उलगडा झाला. घटना उघडकीस आल्यापासून अवघ्या १२ तासांच्या आता चार आरोपींना अटक करण्यात आली. मात्र अन्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी या वाघाला विजेचा करंट देऊन ठार करण्यात आले होते. नंतर त्याचे तुकडे करून त्यांना मोठाले दगड बांधून सिल्लारी बिटाच्या कक्ष क्रमांक २५६ मधील कोडू तलावाच्या खोल पाण्यात टाकण्यात आले होते. वनविभागाच्या तपास पथकाने वाघाचे अवयव कापलेली जागाही शोधून काढली आहे.
ही घटना सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वीची आहे. यामुळे पाण्यात टाकलेले वाघाचे अवयव पर्णत: सडून आणि गळून गेले होते. तरीही अवयवाचे काही तुकडे आणि चामडे पाण्यावर तरंगत होते. हा प्रकार काही गावकऱ्यांना लक्षात आल्यावर गुरुवारी दुपारी वन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकासह तातडीने तलावावर धाव घेऊन पाहणी केली. मात्र तो नक्की वाघच असल्याचे स्पष्ट होत नव्हते. परंतु कापलेल्या अवयवांना मोठाले दगड बांधलेले आढळल्यावर संशय बळावला. त्यानंतर तो वाघच असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
सिल्लारीच्या तलावात सडलेल्या अवस्थेत आढळला वाघ
शुक्रवारी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पेंचच्या क्षेत्रसंचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, प्राधिकरणचे प्रतिनिधी बंडू उइके, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी अजिंक्य भटकर यांच्या उपस्थितीत डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. सचिन कंबोज यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. या प्रकरणाचा तपास एसीएफ अतुल देवकर, आरएफओ जयेश तायडे करीत आहेत.
...घोटी गावातून रात्री पकडले आरोपी
गुप्त सूत्रांच्या महितीवरून वनविभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा घोटी गावातून तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी वाघाची शिकार केल्याचे कबूल केले. यानंतर शुक्रवारी सायंकाळी अन्य चवथ्या आरोपीला अटक करण्यात आली. तपासानंतर शुक्रवारी चार आरोपींना अटक करून रामटेक प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या चौघांनाही १७ जानेवारीपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.