लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलिस दलातील चार पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाने एकाच दिवशी चार पोलिसांचा बळी घेतल्यामुळे पोलिस दलात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.पोलीस नाईक सुरकर (सक्करदरा पोलीस ठाणे), महिला पोलीस हवालदार वत्सला मसराम (पोलीस मुख्यालय), सहायक फौजदार मडावी (पोलीस ठाणे गणेशपेठ) आणि सुनील सेलोकर (सहायक फौजदार) अशी मृतांची नावे आहेत.
शहर पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. शुक्रवारी कोरोनाबाधित एकूण पोलिसांची संख्या आता ७४२ झाली होती. कामाचा सारखा ताण आणि सलग इकडून तिकडे धावपळ होत असल्यामुळे कोरोनाविरुद्ध लढणारे पोलीस बांधव अलीकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. यापूर्वी कोरोनामुळे सहा पोलिसांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी आणि शनिवारी २४ तासात पुन्हा चार पोलिसांचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे ही संख्या आता १० वर पोहोचली आहे. अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या नातेवाईकांसह ७४२ जणांना लागण झाली आहे. यातील काही जणांचा घरी तर काही जणांचा वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहे. २४ तासात सुरकर, मसराम, मडावी आणि सेलोकर अशा चार पोलिसांचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे पोलिस दलात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.