नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकांनी शुक्रवारी धरमपेठ झोन अंतर्गत रामदासपेठ येथील ऑर्थो हॉस्पिटल, रेस्पिरे हॉस्पिटल व रामदास पेठ येथील गॅस्ट्रो व्हिजन हॉस्पिटल आणि मेडिग्रेस हॉस्पिटल अशा चार हॉस्पिटलमधील वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकल्याने प्रत्येकी ५० हजार रुपये दंड वसूल केला. तसेच रामदासपेठ येथील मेडिकेअर क्लिनिक यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
उपद्रव शोधपथकाने शुक्रवारी १२ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग आणि मंगळवारी झोन पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात चार प्रतिष्ठानांवर कारवाई करून २० हजार रुपयांचा दंड वसूल करून नऊ किलो प्लास्टिक जप्त केले.
प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत महाल, गांधीगेट येथील अर्जुन भांडार आणि सरताज अगरबत्ती, गांधीबाग पोस्ट ऑफिस येथील संजय ट्रेडर्स, छावणी सदर येथील दिल्ली ग्रील रेस्टाॅरंट या दुकानांविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.
गोपालनगर येथील हेडाऊ बिल्डर्स यांच्या विरुद्ध रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याने १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. हजारिपहाड येथील महेंद्र बोरकर यांनी रस्त्यावर कचरा टाकल्याने दहा हजार रुपये, तर न्यू नरसाळा रोड येथे लाल पॅथॉलॉजी लॅब यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोधपथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.