सुमेध वाघमारे नागपूर : मेडिकलमध्ये सिटी स्कॅन काढण्यासाठी आणलेल्या एका रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी चार निवासी डॉक्टरांना मारहाण केली. सुरक्षा रक्षकांनी लागलीच नातेवाईकांना पकडून अजनी पोलिसांच्या हवाली केले. या घटनेने मेडिकलमध्ये खळबळ उडाली.
केरळ येथील अझिझ मेडिकल कॉलेजमधील रुग्णावर उपचार करीत असता २२वर्षीय एका महिला डॉक्टरवर रुग्णांचा नातेवाईकाने जीवघेणा हल्ला केला. यात त्या डॉक्टरचा मृत्यू झाला. या घटनेला घेऊन नागपूर मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी कँडल मार्च काढून निषेध नोंदविला. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी या घटनेमुळे निवासी डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार,आज सोमवारी दुपारी १२.३० वाजता ४५ वर्षीय एका इसमाला पोटावरील उपचारासाठी त्याचा नातेवाईकांनी मेडिकलच्या अपघात विभागात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती नातेवाईकांना दिली. डॉक्टरांनी रुग्णाला वॉर्डमध्ये भरती करून घेण्यास व त्यापूर्वी सिटी स्कॅन काढण्याचा सल्ला दिला. सोबत एक निवासी डॉक्टरही दिला. रेडिओलॉजी विभागाचा सिटी स्कॅन कक्षात रुग्णाला आणले असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी रेडिओलॉजी विभागाच्या निवासी डॉक्टरसह आणखी दोन डॉक्टरांनी धाव घेतली. रुग्णाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला.
रुग्ण गंभीर असताना वरीष्ठ डॉक्टर उपस्थित का नव्हते या कारणावरून नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी चार निवासी डॉक्टरांना मारहाण केली. त्याचवेळी सुरक्षा रक्षक धावून आले. त्यांनाी नातेवाईकांना पकडून अजनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाण झालेल्या डॉक्टरांनी अजनी पोलिस ठाण्यात नातेवाईकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मेडिकल प्रशासनानेही पोलिसांना पत्र देऊन तत्काळ कारवाई करण्याचे पत्र दिले. या घटनेला ‘मार्ड’ संघटनेने गंभीरतेने घेतले आहे. त्यांनी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. सध्यातरी ते संपावर जाणार नसल्याचे समजते.