नागपूर : अवेधरित्या रेतीची तस्करी करणारे चार ट्रक जप्त करून चौघांना अटक करीत ८२ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हुडकेश्वर पोलिसांनी जप्त केला आहे. आकाश वसंतराव शंभरकर (वय २४, रा. उदासा, ता. उमरेड), धनीराम दसरू सरीआम (वय ३३, रा. दिघोरी), कृष्णा श्रीहरी बोरीकर (वय २४, रा. उमरेड) आणि गड्डु पुसू गंजू (वय २४, रा. खरबी) अशी अटक करण्यात आलेल्या रेती तस्करांची नावे आहेत.
हुडकेश्वर पोलिसांचे पथक सोमवारी ८ जानेवारीला रात्री ११.४० ते ९ जानेवारीला रात्री १२.१० दरम्यान गस्त घालत होते. दिघोरी नाका चौकात पोलिसांना ट्रक क्रमांक एम. एच. ४०, सी. एम-६८२७, एम. एच. ४०, सी. एम-९३३४, एम. एच. ४९, बी. झेड-१६५५ व एमएच-४९-एटी-३२३७ या क्रमांकाचे ट्रक संशयास्पद स्थितीत जाताना दिसले.
पोलिसांनी ट्रक थांबविले. त्यात रेती भरलेली होती. ट्रक चालकांना रॉयल्टीबाबत विचारणा केली असता चालकांनी रॉयल्टी दाखविली नाही. पोलिसांनी चार ट्रक, २ लाख ६५ हजार रुपये किमतीची रेती असा ८२ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक केली. याबाबत कलम ३७९, ३४ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक मालक अक्षय उडान, पवन शेंडे, साबीर खान व इस्माइल अन्सारी यांचा शोध सुरु केला आहे.