हैदोस रोखण्यासाठी प्रशासन सज्ज : सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळेनागपूर : मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उद्या शहरात मोठा जल्लोष होणार आहे. जल्लोषाला गालबोट लागू नये, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, उत्साहात उत्सव साजरा व्हावा, अनावश्यक हैदोस आणि धिंगाणा वेळीच नियंत्रणात यावा, यासाठी शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ४ हजार ३०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे पसरवण्यात आले आहे. पोलीस आयुक्त एस. पी. यादव यांनी शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. सर्वच पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील असामाजिक प्रवृत्तीचे लोक, अभिलेखावरील गुन्हेगार आणि अवैधरीत्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध त्यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मादक पदार्थ आणि अवैध मद्यविक्रेत्यांविरुद्ध धाडी टाकून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात ७२ ठिकाणी नाकाबंदी, १०० ठिकाणी फिक्स पॉर्इंट, १५० बीट मार्शल, पेट्रो व्हॅन आणि जीप पेट्रोलिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुलींच्या वसतिगृहासमोर, नाक्यांवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक-नाशकची चार पथके, सर्व पोलीस ठाण्यातील पथके, महिला पथके, आरसीपी पथके, जलद गती पथके (क्यूआरटी), दंगेखोरांना पिटाळणारे वज्र, वरुण आणि शहर गुन्हे शाखेची पथके जागोजागी तैनात करण्यात आली आहेत. ठराविक चौकात लोखंडी कठडे उभारून तपासणी केली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळेफुटाळा तलाव, व्हेरायटी चौक, ट्राफिक पार्क, एलएडी कॉलेज चौक, पागलखाना चौक, लिबर्टी चौक, पूनम चेम्बर्ससमोरील भाग, सेमिनरी हिल्स, मानकापूर क्रीडा चौक, कोराडी नाका, महादुला टी-पॉर्इंट, इंदोरा, कडबी चौक, आॅटोमोटिव्ह चौक, कमाल चौक, सदर रेसिडेन्सी रोड, तेलंगखेडी हनुमान मंदिर आदी महत्त्वाच्या ठिकाणी मनपा आणि नासुप्रच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरवण्यात आले आहे.
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर चार हजार पोलिसांचा वॉच
By admin | Published: December 31, 2015 3:17 AM