एक हजार होमगार्ड
----
२५० ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था
---
६५ संवेदनशील स्थळे, सर्व ठिकाणी फिक्स पॉईंट
प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तिथी जवळ आल्याने शहर पोलिसांनी बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. राज्य राखीव दलाची तुकडी अन् एक हजार होमगार्डसच्या मदतीने चार हजार पोलीस विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी रात्री पत्रकारांना दिली.
शहरात अत्यंत उत्साहात गणेशोत्सव पार पडला असून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आता बाप्पाला निरोप देण्याचा दिवस जवळ आल्याने पोलिसांनी सर्व तयारी पूर्ण केल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले. शहरात ४५० सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली होती. त्यातील साधारणता २५० मंडळांकडून रविवारी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले जाईल, असा अंदाज पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. सोबत शेकडो घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन होईल. त्यासाठी शहरात २५० ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था असून सकाळी ९ वाजतापासूनच शहरातील सर्व तलावाच्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.
शहरात ६५ संवेदनशील स्थळे असून त्या प्रत्येक ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. फिक्स पॉईंट, सीसीटीव्ही कॅमेरा आणि पोलीस सर्व्हिलन्स व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूका, बॅण्ड पथकाला बंदी असून, कुणीही त्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
---
साैहार्दाची परंपरा अखंडित राहील
सर्वधर्मसमभावाचे शहर म्हणून नागपूरची सर्वत्र ओळख आहे. गेल्या ९ दिवसात शहरात अत्यंत जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. विसर्जनही अशाच पद्धतीने पार पडेल आणि शहराची साैहार्दाची परंपरा कायम राहील, असा विश्वास अमितेशकुमार यांनी व्यक्त केला.
---
उल्लंघन करणारांवर कडक कारवाई
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुरीचा गणपती वगळता कोणताही गुन्हा अथवा गैरप्रकार शहरात घडला नाही. रविवारी विसर्जनही चांगल्या प्रकारे पार पडेल, यासाठी सार्वजनिक मंडळांना नियमावली तयार करून देण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या किंवा कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला.
---