खोका अन् सुपारी सहा दिवसांची चौकशी धागेदोरे गवसलेच नाहीतनरेश डोंगरे नागपूरएकनाथराव निमगडे हत्याकांडातील शूटर शोधण्यासाठी तब्बल एक हजार पोलीस आणि त्यांचे तीन हजारांवर खबरे रात्रंदिवस तपास करीत आहेत. मात्र, सहा दिवस होऊनही या प्रकरणातील धागादोरा पोलिसांना गवसलेला नाही. परिणामी पोलीस दलात या हत्याकांडाच्या अनुषंगाने तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. गुन्हेगारी वर्तुळातही हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. हत्याकांडातील शूटरला वर्षभरापूर्वी झालेल्या ‘भतिजावरील फायरिंग‘शी जोडून गुन्हेगारी वर्तुळात खोका अन् सुपारी किलर्सची चर्चा केली जात आहे. मंगळवारी सकाळी निमगडे यांच्यावर अॅक्टिव्हावरील हल्लेखोराने आठ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेला आता सहा दिवसांचा कालावधी झाला. मात्र, निमगडेंचा मारेकरी शोधून काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. शंभर ते दीडशे कोटींच्या जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा संशय असल्यामुळे हल्लेखोर सुपारी किलर असल्याचा अंदाज आहे. दुचाकीचाही पत्ता नाहीनागपूर : निमगडे यांच्यासोबत वाद असलेले ट्रान्सपोर्टर मकसूद सिद्दीकी, बिल्डर अनिल नायर, आदित्य गुप्ता आणि त्यांचे वडील, त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती शहरातील गुन्हेगारी जगताचा भाई संतोष आंबेकर, इप्पा टोळीतील नौशाद आणि शंभरपेक्षा जास्त गुन्हेगारांची पोलिसांनी कसून चौकशी केली. परंतु या चौकशीतून हत्याकांडाशी जुळलेला कोणताही धागादोरा पोलिसाच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे, या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी केवळ तहसील पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी नव्हे तर शहरातील २९ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हजारावर पोलीस अधिकारी, कर्मचारी, या सर्वांचे शहराच्या कानाकोपऱ्यात असलेले दोन ते तीन हजार पंटर, गुन्हेशाखेचे शंभरावर अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे हजारएक पंटर असे सुमारे चार ते पाच हजार जण कामी लागले आहे. मात्र, मारेकरी सोडा त्याने वापरलेल्या दुचाकीचाही पत्ता पोलिसांना गवसलेला नाही. त्यामुळे आता गुन्हेगारी वर्तुळातही या हत्याकांडाने चर्चेचे मोहोळ उडले आहे. इफ्तेखार ऊर्फ भतिजा याच्यावर गेल्या वर्षी पवित्र रमजानच्या महिन्यात मोमिनपुऱ्यात भल्यासकाळी फायरिंग झाली होती. त्याच्यावरही अशाच प्रकारे मारेकऱ्याने अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. डोक्यात गोळी लागूनही भतिजा बचावला. सुपारी देऊनच त्याचा गेम करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याची चर्चा त्यावेळी गुन्हेगारात होती. १४ महिने होऊनही या प्रकरणातील शूटर शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. गुन्हेगारी जगतात सहा महिन्यांपूर्वी भतिजाशी वाद असलेल्या एका गुन्हेगाराचे आणि त्याच्या उत्तर प्रदेश-मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गुन्हेगारी टोळ्यातील संबंध चर्चेला आले होते. या गोळीकांडात मांडवली झाल्यामुळेच हल्लेखोरांचे नाव पुढे आले नसल्याचे वृत्तही गुन्हेगारी जगतात चर्चेला आले होते. पोलिसांना हे कळू नये म्हणून खास काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे भतिजावर कुणी गोळी झाडली अन् त्याचा गेम करण्याचा कट कुणी रचला होता, ते उघड झाले नाही. हे प्रकरण ‘अनडिटेक्ट’ च आहे. भतिजाचा गेम करण्याचा प्रयत्न गुन्हेगारी जगतातील साम्राज्याच्या स्पर्धेतून झाला होता. निमगडेचा गेम १०० ते १५० कोटींच्या मालमत्तेच्या संबंधाने झाला असल्याचे मानले जात असल्याने थंड डोक्याने कट रचूनच सुपारी किलरकडून तो करवून घेण्यात आल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे. दरम्यान, छत्तीसगड व मध्यप्रदेशातही शोधाशोध सुरू आहे. (प्रतिनिधी)
एका शूटरच्या शोधासाठी चार हजारांची फौज
By admin | Published: September 12, 2016 2:51 AM