योगेंद्र शंभरकर
नागपूर : महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेण्यासोबतच आता येथील वाघ आणि बिबटेही गोपनीय पद्धतीने जामनगरला नेले जात आहेत. शनिवारी २१ जानेवारीला रात्री गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधून चार वाघ आणि चार बिबटे गुजरातला पाठविण्यात आले. याची दोन दिवस कुणालाच माहिती नव्हती; परंतु सोमवारपर्यंत वन्यजीवप्रेमींना याची माहिती कळताच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही व्यक्तींनी तर मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्याच्या बहाण्याने वाघ आणि बिबटे पकडून गुजरातला पाठविण्यात येत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काही दिवसांपूर्वी हत्ती गुजरातला पाठविण्यात आले होते. गेल्या बुधवारी ११ जानेवारीला ब्रह्मपुरी येथून रेस्क्यू केलेला एक वाघ आणि वाघिणीला बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात पाठविण्यात आले होते. याची माहिती गोरेवाडा व्यवस्थापनाने प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना दिली होती. आता अचानक वाघ आणि बिबटे मोठ्या संख्येने जामनगरला पाठविल्यानंतरही गोरेवाडा व्यवस्थापनाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली नाही. सूत्रांनुसार संजय गांधी उद्यान बोरिवलीसाठी वाघाची जोडी रवाना करताना जामनगर (गुजरात) येथील एका मोठ्या उद्योगपतीच्या खासगी प्राणिसंग्रहालयातील काही अधिकाऱ्यांचे पथक गोरेवाडाला पोहोचले होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून ज्या वाघाच्या रवानगीसाठी मंजुरी देण्यात आली होती, त्यांच्या ऐवजी हे पथक दुसऱ्याच वाघाला घेऊन गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गुजरातच्या खासगी प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सूत्रांच्या मते प्राधिकरणाने खासगी प्राणिसंग्रहालयासाठी गोरेवाडाचा वाघ ‘साहेबराव’ला पाठविण्याची मंजुरी दिली होती. परंतु, गुजरातची टीम साहेबरावला घेऊन गेली नाही. यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा होत आहे.
सीझेडए व राज्य शासनाच्या निर्देशानुसार पाठविले
गोरेवाडा प्रकल्पातील चार वाघ आणि चार बिबटे जामनगरला पाठविण्यात आले आहेत. त्यासाठी प्राधिकरणाची (सीझेडए) परवानगी सोबतच राज्य शासनाचे निर्देश मिळाले होते.
- शतानिक भागवत, विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा प्रकल्प
....