नागपूर : उद्योग-व्यवसायामुळे शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या तसेच विभिन्न ठिकाणी पार्किंगच्या अव्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीला नव्या आधुनिक उपाययोजनांनी उत्तर देण्याची तयारी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘स्पेस मल्टिप्लायर (जागेचे गुणोत्तर)’ योजनेंतर्गत कमी जागेत जास्तीत जास्त चारचाकी उभ्या करण्याचे व्यवस्थापन, ही आधुनिक काळाची गरज असल्याचे मत पार्किंग सोल्युशन्स तज्ज्ञ व व्होर पार्किंग सिस्टिम्स प्रा. लि.चे उपाध्यक्ष संदीप कुळकर्णी यांनी आज येथे व्यक्त केले.
शुक्रवारी वास्तुविशारद (आर्किटेक्चर्स) व शहरातील बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर्स) भविष्यातील पार्किंग सोल्युशन्स व उपाययोजनांबद्दल माहिती देण्याच्या हॉटेल हरदेव येथे पार पडलेल्या विशेष सत्रात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वर्तमानासोबतच भविष्यातील येणाऱ्या समस्यांची सोडवणूक आतापासूनच करणे अपेक्षित आहे. जिथे राहतो तिथे, जिथे काम करतो तिथे आणि जिथे कुठे जातो त्या सर्व ठिकाणी वर्तमानातच पार्किंगच्या समस्येने तोंड वर केले आहे. भविष्यात ही समस्या आणखी तोंड काढणार असून, त्या अनुषंगाने मल्टिप्लायर पार्किंग हाच भविष्याचा नारा असणार असल्याचे कुळकर्णी म्हणाले. एका कारला लागणाऱ्या जागेत एकावर एक दोन ते सात-आठ आणि पुढे एवढ्या कार पार्किंग केल्या जाऊ शकतात आणि पार्किंगची समस्या सोडवली जाऊ शकते, असे ते म्हणाले. नागपुरात व्हीआर मॉल, नानिक ग्रुप, गोलछा ग्रुप आदींमध्ये हे नवे तंत्रज्ञान वापरले जात असून, फुटाळा तलाव परिसरात पर्यटनाच्या अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी एकाच वेळी साडेसहाशे कार पार्क ‘स्पेस मल्टिप्लायर’ पद्धतीने केल्या जाणार आहेत आणि त्याचे कार्य प्रगतिपथावर असल्याचे संदीप कुळकर्णी यांनी यावेळी सांगितले.
.....................