लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर( हिंगणा ) : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेस परिसरात राहणाऱ्या एका युवकाने चॉकलेटचे आमिष दाखवून दोन कि.मी. दूर जंगलात नेले. परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी मागावर जाऊन त्या तरुणाला पकडून चोप दिला व एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अमरनगर येथे घडली. सुनील कंचरी शाहू (३०) असे या तरुणाचे नाव आहे. मुलीच्या घराशेजारी तो भाड्याने राहतो. ही चार वर्षीय बालिका दुपारी १ वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत होती. तिला चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून एमआयडीसी परिसराला लागून नागलवाडी शिवारातील जंगलात घेऊन गेला. मुलगी कुठे दिसत नसल्याने तिच्या घरच्या मंडळीने शोधाशोध केली. गावातील तरुण गोळा झाले.अमरनगर परिसरात दोन तास गावकऱ्यांनी शोध घेतला. तेव्हा एका तरुणासोबत एक बालिका जंगलाच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नागरिकांनी जंगलात जाऊन त्या तरुणाला पकडले. त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्याला पकडून गावात आणले तेव्हा काही काळ तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी तिथे पोहचून आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस पुढील तपास करीत असून बातमी लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.