नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात अतिदक्षता कक्षात (एसएनआयसीयू) लागलेल्या आगीतून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता चार युवकांनी पहिल्या मजल्यावर शिडीच्या मदतीने चढत, कक्षाचे दार तोडून ७ बालकांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. ही सर्व बालके सुखरूप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या युवकांमध्ये दोन रुग्णालयाचे सुरक्षारक्षक तर दोन खासगी रुग्णवाहिकेचे चालक आहेत. या युवकांनी दहा बालकांना वाचवू शकलो नाही, अशी खंतही व्यक्त केली.
जिल्हा रुग्णालयातील ‘एसएनआयसीयू’मध्ये २५ इन्क्युबेटर आहेत. शनिवारी १७ चिमुकले या कक्षात भरती होते. हा कक्ष काचेचे पार्टीशियन करून दोन भागात विभागला आहे. पहिल्या कक्षात गंभीर बालकांना तर दुसऱ्या कक्षात कमी गंभीर बालकांना ठेवले जाते. या कक्षात लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागली की इन्क्युबेटर जळाल्याने लागली, याचा तपास केला जात आहे.
‘लोकमत’शी बोलताना खासगी रुग्णवाहिका चालक राजकुमार दहेकर व राहुल गुप्ता यांनी सांगितले. पहाटे १ वाजून ५० मिनिटांनी सुरक्षारक्षक गौरव रेहपाडे व शिवम मडावी यांचा रुग्णालयात आग लागल्याचा फोन आला. आम्ही तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. पहिल्या मजल्यावरून धूर बाहेर येत होता. आंतररुग्ण विभागातून पहिल्या मजल्याकडे जाण्यास निघालो असता, धुरामुळे आणखी समोर जाणे कठिण झाले होते. यामुळे इमारतीच्या मागील भागातून शिडीने पहिल्या मजल्यावर पोहोचलो. ‘एसएनआयसीयू’चे दार आतून बंद होते, यामुळे दार तोडले. दार तोडताच नाका-तोंडात धूर गेला. तोंडाला रुमाल बांधून सामोर गेलो. सर्वत्र अंधार होता. यामुळे खिडक्यांच्या काचा फोडल्या. धूर कमी झाल्यावर इन्क्युबेटर असलेल्या बालकांना बाहेर काढणे सुरू केले. दोन हातांनी दोन बालकांना पकडून बाहेर असलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना खाली असलेल्या रुग्णवाहिकेत ठेवणे सुरू केले. सातही बालकांना रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर दुसऱ्या बालकांना वाचविण्यास पुन्हा ‘एसएनआयसीयू’मध्ये गेलो असताना तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. १० बालकांना आम्ही वाचवू शकलो नाही, ही खंत जीवनभर सलत राहणारी आहे. रुग्णवाहिकेतील बालकांना नंतर डॉक्टरांनी तपासून दुसऱ्या वॉर्डात भरती केले.