लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौदाव्या वित्त आयोगातून नागपूर जिल्ह्याला वर्ष २०१९-२० च्या बेसिक ग्रॅण्टच्या पहिल्या हप्त्यापोटी ३७ कोटी ६३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गावाला लोकसंख्या (९० टक्के) आणि क्षेत्रफळ (१० टक्के) या प्रमाणात निधी वितरित करण्यात येणार आहे. जादा लोकसंख्या असलेल्या गावांना जास्त निधी मिळणार आहे.चौदाव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्याऐवजी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. या निधीतून गावांमध्ये अनेक योजना राबविल्या जात आहे. यापूर्वी ग्रा.पं.ला जि.प. वर निधीसाठी अवलंबून राहावे लागत होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. याशिवाय सरपंचाच्या अधिकारातही राज्य सरकारने वाढ केली आहे. जनतेतून थेट सरपंच निवडला जात आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या जनरल बेसिक ग्रँण्टच्या पहिल्या हप्त्याची रक्कम केंद्र शासनाने दिली आहे. ही रक्कम राज्य शासनाकडून जिल्ह्यांना वर्ग करण्यात येणार आहे. यंदा जिल्ह्याला पहिल्या हप्त्यापोटी तब्बल ३७ कोटी ६३ लक्षावरचा निधी मंजूर झाला आहे. ९० टक्के निधीचा विनियोग ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांसाठी खर्च करायचा आहे. १० टक्के निधीचा वापर प्रशासकीय तांत्रिक बाबींसाठी करायचा आहे, असे शासनाने निर्देश दिले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निधी ग्रा.पं.ला वितरित करण्यात येणार आहे.
चौदाव्या वित्त आयोगाकडून नागपूर जिल्ह्याला ३७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:29 PM