सुमेध वाघमारे नागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सेस व कर्मचाऱ्यांच्या संप काळात कंत्राटी पद्धतीने नर्सेस व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचे आदेश अवर सचिवांनी दिले आहेत. मात्र, कंत्राटी नर्सेस उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सीच नाही. यामुळे संप असेपर्यंत रुग्णांचे हाल कमी होणे शक्य नसल्याचे चित्र आहे.
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मेयो, मेडिकलसह डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय व कामगार विमा रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संपाचा शुक्रवार चौथा दिवस होता. या सर्वच रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनुभवी नर्सेसच्या जागी कमी संख्येतील नर्सिंग विद्यार्थ्यांवर रुग्णसेवा सांभाळत आहे. तंत्रज्ञ, फार्मासिस्टची कामे फिजीओथेरपीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर आली आहे. सफाईची कामेही खोळंबली ओहत. एकूणच रुग्णसेवा प्रभावित झाल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.