नागपूर : वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता. पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला. आता हा प्रकल्प गुजरातमध्येही साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. प्रकल्प गेल्यामुळे देशाचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
लोंढे म्हणाले, हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती. मविआ सरकारनेही सर्व सवलती व सुविधा देण्याची तयारी दर्शवली होती पण महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला पळवून नेला. आता तिथेही होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक आहेत, अशी घणाघाती टीका लोंढे यांनी केली.
तब्बल १.५ लाख कोटी रुपये गुंतवणुक व १ लाख नोकऱ्या निर्माण करणारा हा प्रकल्प होता. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी पुणे परिसरातील वातावरण अत्यंत अनुकुल असे आहे. पुणे हे औद्योगीक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, आवश्यक सोयी सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी द्यावयाच्या सुविधा व सवलतीसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. पण हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला. गुजरातमध्ये ज्या भागात य प्रकल्पाला जागा देण्यात आली त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणे अशक्यच होते, शेवटी तेच झाले. हा प्रकल्प गेल्यामुळे देशाचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या हाताखालून गेला. राज्यातील लाखो तरुणांचे रोजगारही गेले. प्रकल्प गुजरातला नेला पण गुजरात सरकार व केंद्र सरकारने या प्रकल्पाना सोयी सुविधा दिल्या नाहीत असे रॉयटर या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
मायक्रॉन प्रकल्पावरही संशयाचे ढग
- फॉक्सकॉनने वेदांताबरोबरचा करार मोडीत काढल्याने आता मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या भवितव्यावरही संशयाचे ढग जमा झालेत. वायब्रंट गुजरात व मेक इन इंडियाच्या नावाने मोठ्य-मोठ्या घोषणा केल्या गेल्या पण प्रत्यक्षात त्यातील किती प्रकल्प आले यावर श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. फॉक्सकॉनने माघार घेतल्याने इतर कंपन्यांच्या परदेशी गुंतवणुकीवरही याचा परिणाम होऊन भारताचे नुकसानच होणार आहे, अशी खंत लोंढे यांनी व्यक्त केली.