नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
उस गंद में कुछ इस तरहसे वो मशरूफ हो गये।
की खुद अपनों की भी सुगंध को वो भूल गये...।।
नागपूर : भक्कम तटबंदी अन् भेसूर भिंतीच्या आड काही नराधमांच्या सहवासामुळे अनेकांच्या जगण्याचा स्वादच हरपला आहे. खिन्न मनाने रुक्ष वातावरणात अन् नकोशा दुर्गंधीत ते दिवस मोजत आहेत. त्यांचा श्वास सुगंधासाठी तरसतो आहे. त्यासाठी अनेक बंदीवानांची तगमग सुरू आहे. ती लक्षात घेत कारागृह प्रशासनाने कारागृहाच्या ‘भक्कम तटबंदीला सुगंध’ देण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे भेसूर भिंतीआड सुगंधित उदबत्तीचा (अगरबत्ती) कारखाना लवकरच सुरू होणार आहे. (The fragrance wafting through the strong walls of the prison)
आजूबाजूचे वातावरण चांगले असले की मन प्रसन्न राहते. मन प्रफुल्लित असले की शरीराला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते अन् नंतर तो व्यक्ती चांगला विचार करण्यासोबत व्यवहारही चांगला करतो, असे म्हणतात. समाजातील सर्वांनाच ते लागू पडत असले तरी प्रत्येक जिल्हा स्तरावर एक अशी वस्ती असते की तेथे अशा अनेक बाबी लागूच पडत नाहीत. ही वस्ती म्हणजे कारागृह. गुन्हेगारांची वस्ती म्हणूनही कारागृहाकडे बघितले जाते.
मात्र, प्रयोगशील कारागृह अशी ओळख असलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाने अनेक चांगल्या योजना, उपक्रमाची सुरुवात करून अनेकदा शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कित्येक कैद्यांच्या मनात जगण्याचे एक नवे ध्येय निर्माण केले आहे. त्याचमुळे येथे निर्मित वेगवेगळ्या आकर्षक वस्तू, फर्निचर, राख्या, कपडे अन् मास्कला राज्यभरातून मागणी असते. आता कारागृह प्रशासनाने अत्युच्च दर्जाच्या अगरबत्ती निर्मितीचे अत्याधुनिक युनिट सुरू करण्याची तयारी चालविली आहे. एका एनजीओच्या मदतीने प्रारंभी कारागृहातील ४० महिला कैद्यांना अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हळूहळू नंतर ही संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी एनजीओकडून चार मशीन्स आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था येथे करण्याचे ठरले आहे. ४ सप्टेंबरला या युनिटचा श्रीगणेशा केला जाणार आहे. त्यासाठी आमच्याकडून तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी सांगितले आहे.
सकारात्मकतेवर भर
अलीकडे कैद्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी कारागृहात नवनवीन उपाययोजना सुरू केल्या जात आहेत. नागपूरचे मध्यवर्ती कारागृह यासाठी आधीपासूनच ओळखले जाते. येथे सकारात्मकतेवर चांगला भर दिला जातो. गळाभेट कार्यक्रम असो की कैद्यांचे शिक्षण यात नागपूर कारागृहाचे नाव महाराष्ट्रच नव्हे तर विविध प्रांतात मानाने घेतले जाते. त्याचमुळे कधीकाळी अंडरवर्ल्ड डॉन म्हणून कुख्यात असलेला अरुण गवळी येथील कारागृहात राहून ‘गांधीयन थॉट’ची परीक्षा उत्तीर्ण करू शकला आहे.
---