लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निरज यशवंत सोनेवाणे (वय ३७) यांना अकोल्याच्या एका ठगबाजाने औषध पुरवठ्याच्या नावाखाली ३५ लाखांचा गंडा घातला.
अंकूर अशोक मोहोड (वय ४१) असे आरोपीचे नाव असून तो अकोल्यातील रहिवासी आहे. डॉ. सोनेवाणे शहरातील एका खासगी इस्पितळात सेवारत आहेत. ते अंबाझरीतील शिवाजीनगरात राहतात.
आरोपी एका फार्मा कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याचा डॉ. सोनेवाणे यांच्याशी परिचय झाला. गेल्या वर्षी आरोपी मोहोड डॉ. सोनेवाणे यांच्याकडे आला. आपल्याला औरंगाबाद हेल्थ सर्कल, बीएमसी मुंबई, आर्सेनिक अल्बम आणि मेयो इस्पितळात कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषध पुरवठ्याचे मोठे ‘टेंडर’ मिळाल्याची मोहोडने थाप मारली. तशी बनावट कागदपत्रे डॉ. सोनेवाणे यांना दाखविली. आपल्याकडे एवढी रक्कम नाही. तुम्ही यात रक्कम गुंतवली तर वर्षभरात दामदुप्पट परतावा मिळेल, असेही सांगितले. १० जुलै २०२० ला डॉ. सोनेवाणे यांनी आरोपीला ३४ लाख, ७० हजार रुपये दिले. आरोपीने सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला डॉक्टर त्याच्याकडे परताव्यासाठी विचारणा करू लागले. ९ नोव्हेंबरला आरोपीने त्यांना ३२ लाख, २५ हजारांचा चेक दिला. मात्र, खात्यात रक्कम नसल्याने तो वटलाच नाही. त्यामुळे डॉक्टरांना संशय आला. त्यांनी आरोपीकडे आपल्या पैशासाठी तगादा लावला. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत असल्याने मोहोडने आपली फसवणूक केल्याचे डॉ. सोनेवाणे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी चाैकशीअंती या प्रकरणात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
----
अकोल्यातही गुन्हा
आरोपी मोहोडने अशा प्रकारे अनेकांना लाखोंचा चुना लावला आहे. त्याच्याविरुद्ध अकोला पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.