लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बैद्यनाथचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (वय ३७) यांच्यासोबत राजस्थान, उदयपूरमधील एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी सव्वाकोटींची ठगबाजी केली. मनमोहनराज नाहरमलजी सिंघवी (६०), अभय मनमोहन सिंघवी (४५), शांतीलाल कन्हैयालालजी सरुपिया (६५) आणि पीयूष शांतीलाल सरुपिया (४५) अशी आरोपींची नावे आहेत. हे चारही आरोपी उदयपूरचे रहिवासी आहेत.
शर्मा यांच्या तक्रारीनुसार, या चाैघांनी २८ सप्टेंबर २०१७ ला शर्मा यांच्या फोर्थ पार्टनर एनर्जी प्रा. लि. चे सोलर पॅनल आरोपींच्या एस. एस. एज्युकेशन ट्रस्टच्या इमारतीवर लावले होते. प्रणव शर्मा आणि त्यांच्या भागीदार भावना शर्मा यांनी ते पॅनल फोर्थ पार्टनर एनर्जीकडून १ कोटी, २३ लाख ३२ हजार ८०० रुपयांत खरेदी केले होते. या सोलर प्लांटमधून उत्पन्न होणारी वीज आरोपींची एज्युकेशन ट्रस्ट वापरेल आणि त्या विजेचा भरणा ४.३५ रुपये प्रति किलो व्हॅटप्रमाणे शर्मा यांच्याकडे केला जाईल, असा लेखी करार झाला होता. त्यानुसार आरोपींनी जानेवारी २०१८ पासून वीज वापरली. मात्र, त्याचे १९ लाख रुपये शर्मा यांना दिले नाही. त्याचप्रमाणे त्यांचा १ कोटी ३२ लाखांचा सोलर प्लांटही स्वत:च्या ताब्यात ठेवला. त्यांनी दगाबाजी केल्याचे लक्षात आल्याने शर्मा यांनी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
अनेक दिवसांपासून होता वाद
आरोपींनी आपसी समंजस्यातून रक्कम द्यावी आणि वाद सोडवावा म्हणून शर्मा यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, अनेकदा शब्द देऊनही आरोपींनी तो पाळला नाही. त्यामुळे अखेर प्रकरण पोलिसांत गेले.
----